आषाढी वारीत एसटीचा अभूतपूर्व सहभाग – ९.७१ लाख भाविकांना घडवले विठुरायाचे दर्शन! महामंडळाला ३५ कोटींहून अधिक उत्पन्न...

 
मुंबई (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरच्या श्रीविठ्ठल दर्शनासाठी गेलेल्या तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भाविक-प्रवाशांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) सुरक्षित सेवा पुरवत पंढरपूर येथे ने-आण केली. या सेवेमुळे एसटीला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की, आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरला येतात. या प्रवासाची गरज ओळखून ३ ते १० जुलै या कालावधीत एसटीने ५२०० जादा बसेसच्या माध्यमातून २१ हजार ४९९ फेऱ्या केल्या. या सेवेमुळे एसटी महामंडळाला मागील वर्षाच्या तुलनेत ६ कोटी ९६ लाख रुपयांनी अधिक उत्पन्न मिळाले आहे. सन २०२४ मध्ये आषाढी यात्रेच्या काळात महामंडळाचे उत्पन्न २८ कोटी ९१ लाख ५८ हजार रुपये होते, तर यावर्षी ते ३५ कोटी ८७ लाख ६१ हजारांवर पोहोचले आहे.

या यशामागे हजारो चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक व अधिकारी यांचे परिश्रम असून त्यांनी लाखो भाविकांना सुखरूप दर्शन घडवून आणले, असे प्रतिपादनही मंत्री सरनाईक यांनी केले.वारीच्या काळात पंढरपूरमध्ये तैनात असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना जेवणासाठी अडचण येऊ नये यासाठी ५, ६ व ७ जुलै रोजी मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चातून मोफत जेवण, चहा व नाश्त्याची व्यवस्था केली होती. या उपक्रमाचा लाभ हजारो एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला असून त्यांनी मंत्री सरनाईक यांचे आभार मानले आहेत.