STATE NEWS महाराष्ट्राला पावसाचा भीषण तडाखा!; १३ जणांचा मृत्यू, १० जखमी... एक्सप्रेसवे-रेल्वे वाहतूक ठप्प, मुख्यमंत्र्यांचे मोठे आवाहन!

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस; पूल, दरडी, इमारती कोसळण्याच्या घटनांनी हाहाकार, आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांकही जाहीर...
 
मुंबई (लाइव्ह ग्रुप नेटवर्क): गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १० जण जखमी झाले आहेत. अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून रस्ते, रेल्वे आणि दळणवळण व्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मानखुर्द दुर्घटनेत सर्वाधिक बळी; राज्यभरात विविध ठिकाणी मृत्यू

पावसामुळे घडलेल्या दुर्घटनांमध्ये सर्वाधिक भीषण घटना मुंबईतील मानखुर्द येथे घडली. ५ जुलै रोजी झोपडपट्टीवर इमारत कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. याशिवाय पालघरमध्ये पोहताना बुडाल्याने एका व्यक्तीचा, मुंबई उपनगरात झाड कोसळल्याने दोन जणांचा, साताऱ्यात दरड कोसळून एका व्यक्तीचा, सिंधुदुर्गात बुडून एका व्यक्तीचा, पुण्यात दरड कोसळून एका व्यक्तीचा, ठाण्यात पाण्यात बुडून एका व्यक्तीचा तसेच घर कोसळून आणखी एका व्यक्तीचा आणि रायगडमध्ये पाण्यात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या सर्व घटनांमुळे राज्यातील मृतांचा आकडा १३ वर पोहोचला आहे.

पावसामुळे महामार्ग, रेल्वे आणि घाटमार्गांवर मोठा परिणाम

सततच्या मुसळधार पावसामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेसवे, जुना मुंबई-पुणे महामार्ग, मिसिंग लिंक मार्ग तसेच रेल्वे मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ थांबवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने आणि दरडी कोसळण्याचा धोका वाढल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ही पावले उचलली आहेत.दरम्यान, मावळ आणि ताम्हिणी घाट परिसरात पूरस्थिती निर्माण झाली असून पर्यायी मार्गांवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकारची संपूर्ण यंत्रणा २४ तास सज्ज असून संभाव्य पूरपरिस्थिती किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आले आहेत.मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला देत, केवळ अधिकृत स्रोतांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा आणि गरज भासल्यास तात्काळ हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे स्पष्ट केले आहे.

आपत्कालीन मदतीसाठी हे हेल्पलाईन क्रमांक लक्षात ठेवा

राज्यस्तरीय मुख्य नियंत्रण कक्षासाठी १०७० हा टोल-फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. याशिवाय ०९३२१५८७१४३, ०२२-२२०२७९९० आणि ०२२-२२७९४२२९ या क्रमांकांवरही नागरिक थेट संपर्क साधू शकतात. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यरत असून जिल्हास्तरीय आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक १०७७ ठेवण्यात आला आहे.

 प्रशासनाचे आवाहन

राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी नदी, नाले आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास घाबरून न जाता तात्काळ अधिकृत हेल्पलाईनवर संपर्क साधून प्रशासनाची मदत घ्यावी, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.