खामगाव – मेहकर वर्दळीच्या मार्गावरील रामनगर रस्त्यावर भरधाव वाहने सुसाट! अपघाताची शक्यता,स्पीड ब्रेकर बसवण्याची गावकऱ्यांची मागणी

 
खामगाव (भागवत राऊत : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : खामगाव – मेहकर महामार्गावरील रामनगर रस्त्यावर भरधाव वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी रामनगर येथील ग्रामस्थांनी केली आहे.
खामगाव – मेहकर रस्त्यावर रामनगर हे गाव रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वसलेले आहे. दररोज येथील नागरिकांना शेतीकामाकरिता तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्यासाठी हा रस्ता ओलांडावा लागतो. मात्र, या ठिकाणी कोणतेही स्पीड ब्रेकर नसल्यामुळे वाहनांची वाहतूक अतिशय वेगाने होत आहे.

गेल्या वर्षी या रस्त्यावर मोठा अपघात झाला होता. त्यामध्ये एका व्यक्तीचा पायही मोडला होता. चिमुकले विद्यार्थी, शेतकरी आणि वयोवृद्ध नागरिकांना दोन्ही बाजूंनी रस्ता ओलांडताना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागतो.

खामगाव – मेहकर हा अत्यंत महत्त्वाचा मुख्य रस्ता असल्याने दररोज हजारो वाहने ये-जा करतात. त्यामुळे या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविल्यास अपघातांची शक्यता कमी होऊ शकते. “आमच्या रस्त्यावर तातडीने स्पीड ब्रेकर बसवावेत,” अशी मागणी रामनगर येथील ग्रामस्थांनी केली आहे.