धाड पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार; टोळीप्रमुखासह आरोपींची गावातून धिंड:व्यापाऱ्यांना हप्ता मागणे भोवले...

 
धाड (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात मस्तावलेल्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी धाड पोलिसांनी धाडसी कारवाई करत संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार धाडचे ठाणेदार प्रताप भोस यांनी अक्षय बिलंगे टोळीच्या प्रमुखासह साथिदारांना अटक करून त्यांची गावातून धिंड काढली. धाडच्या इतिहासातील ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात असून पोलिसांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
६ फेब्रुवारी २०२६ रोजी समर्थ मेडिकलच्या संचालकाला मारहाण करून जीवघेणी धमकी देत खंडणी मागितल्याप्रकरणी या टोळीवर गुन्हा दाखल झाला होता. तपासात आरोपी संघटितपणे गुन्हे करत असल्याचे उघड झाले. त्यांच्याकडून विनानंबर प्लेटच्या दुचाकी, महागडे मोबाईल आदी साहित्य जप्त करण्यात आले असून ते गुन्हेगारी पैशातून घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

अटक आरोपी अक्षय जीवनलाल बिलंगे, रोशन गणेश शिंदे आणि राहुल विजय दळवी यांना १६ फेब्रुवारी रोजी बेड्या ठोकून धाड शहरातील प्रमुख मार्गांवरून पायी फिरवण्यात आले. या कारवाईतून “गुन्हेगार कितीही मोठा असला तरी कायद्यापेक्षा मोठा नाही” हा स्पष्ट संदेश देण्यात आला. न्यायालयाने आरोपींना २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेली ही कारवाई तपास पथकासाठी मोठा विजय मानली जात आहे. या ‘ऑन-फिल्ड’ अॅक्शनमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र आहे.