‘माझी वसुंधरा’त सिंदखेडचा डंका; राज्यात द्वितीय, विभागात प्रथम; पर्यावरण संवर्धनात सिंदखेडची झेप; पंकजा मुंडे यांच्या हस्ते गौरव...

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात मोताळा तालुक्यातील सिंदखेड ग्रामपंचायतीने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत राज्यस्तरावर द्वितीय तर अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकावत ग्रामपंचायतीने बुलढाणा जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. या कामगिरीबद्दल राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
पंचतत्त्वांवर आधारित ‘माझी वसुंधरा’ अभियानाची सुरुवात २ ऑक्टोबर २०२० रोजी झाली. ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ (१ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४) मध्ये राज्यातील २२,६३२ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत विदर्भातून एकमेव सिंदखेड ग्रामपंचायतीने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला. त्यानंतर ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ (१ जून २०२४ ते ३१ मार्च २०२५) मध्ये २८,३१७ संस्थांमधून स्पर्धा होत असताना सिंदखेडने विभागात प्रथम क्रमांक मिळवला.

अभियानांतर्गत मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड, देवराई प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, वायू गुणवत्ता तपासणी, जलसंधारण, रेनगेज बसविणे व पावसाचे पाणी साठवण यांसारखे उपक्रम राबविण्यात आले.

सन्मान सोहळा सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम  येथे पार पडला. “ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग आणि प्रशासनाच्या समन्वयामुळे हे यश शक्य झाले,” असे गट विकास अधिकारी अशोक काळे यांनी सांगितले. सरपंच प्रवीण कदम यांनी हा पुरस्कार संपूर्ण गावाचा असल्याचे नमूद केले.