धक्कादायक! वसाली प्रा. आ.केंद्रात जाळली औषधे! दोषींवर कारवाई होणार? जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणाले.....वाचा नेमका प्रकार काय

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आदिवासी दुर्गम भागात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. मात्र अधिकार्रयांच्या दुर्लक्षामुळे आदिवासी आरोग्यसेवेपासूनच वंचित राहत आहेत.  संग्रामपूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, वसाली येथे औषधे परस्पर जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी  तालुका आरोग्य अधिकारी संग्रामपूर डॉ. चंद्रशेखर मारोडे यांनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देत प्रत्यक्ष पाहणी करून प्राथमिक चौकशी केली. या चौकशीत जाळलेली औषधे मुदतबाह्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच शासकीय औषधांची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेचे उल्लंघन झाल्याचेही चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी दिली.
अहवालानुसार, प्राथमिक आरोग्य केंद्र वसाडी हे दि. १० मार्च २०२४ पासून कार्यान्वित असून ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा पुरविण्याचे महत्त्वाचे काम या केंद्रामार्फत केले जाते. सध्या येथे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. श्रीमती साधना गोंड दि. १९ ऑगस्ट २०२५ पासून कार्यरत आहेत, तर बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. ऋषिकेश घनोकार दि. २८ मे २०२५ पासून सेवा बजावत आहेत.

केंद्रातील काही पॅरामेडिकल कर्मचारी बाह्यस्त्रोत पद्धतीने नियुक्त करण्यात आले असून हे कर्मचारी वर्टस हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. या कंपनीमार्फत कार्यरत आहेत. यामध्ये आरोग्य सहाय्यक जी.एच. राठोड, औषध निर्माण अधिकारी ऋषिकेश यादगीरे, लिपिक किशार कराळे तसेच शिपाई आकाश महाले, रवि मुजाल्दा, छगन माळी, सपना झालटे यांचा समावेश आहे. हे सर्व कर्मचारी दि. ११ ऑगस्ट २०२५ पासून सेवेत असल्याची नोंद चौकशीत आढळून आली.
दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हालचाल रजिस्टरची पाहणी केली असता वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना गोंड व आरोग्य सहाय्यक जी.एच. राठोड हे मौजे आलेवाडी येथे लसीकरण सत्रासाठी गेले असल्याचे स्पष्ट झाले. तसेच सकाळची ओपीडी पूर्ण झाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश घनोकार व इतर कर्मचारी केंद्रातून निघून गेले होते. मात्र, पुरुष शिपाई आकाश महाले व रवि मुजाल्दा हे केंद्रावर उपस्थित असल्याची नोंद आहे.

दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवाराची पाहणी केली असता मुदत संपलेल्या औषधांचे अवशेष अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आले. यामध्ये साय. मेट्रोनिडाझोल (मुदत १२/२०२५) १० बाटल्या, कॅल्शियम गोळ्या (०८/२०२५) ५०० नग, डेक्सामेथासोन इंजेक्शन (११/२०२५) २० व्हायल्स, फेनारामाइन इंजेक्शन (१०/२०२५) ५० व्हायल्स तसेच जेन्टामायसिन इंजेक्शन (११/२०२५) २०० व्हायल्स यांचा समावेश आहे. यापैकी मेट्रोनिडाझोल या औषधाची मुदत चालू महिन्यात संपत असली, तरी उर्वरित सर्व औषधे मुदतबाह्य झालेली असल्याचे निदर्शनास आले.

चौकशीदरम्यान औषध निर्माण अधिकारी ऋषिकेश यादगीरे व पुरुष शिपाई छगन माळी यांनी कोणालाही पूर्वकल्पना न देता तसेच शासनाने निश्चित केलेल्या विहित प्रक्रियेचे पालन न करता ही औषधे जाळल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुढील सखोल चौकशी करण्यात येणार असून दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी दिले आहेत. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषध व्यवस्थापन व विल्हेवाटीबाबत स्पष्ट सूचना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.