शिवपुरीच्या मंगेश सुरुशेंचे घवघवीत यश! MPSC वनसेवा परीक्षेत राज्यात ११ वा क्रमांक; शेतकरी कुटुंबातील युवक ACF अधिकारी...
Dec 20, 2025, 18:30 IST
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : परिस्थितीवर मात करत कठोर परिश्रमाच्या बळावर तालुक्यातील शिवपुरी येथील शेतकरी कुटुंबातील युवक मंगेश सुमन आत्माराम सुरुशे यांनी MPSC वनसेवा (Forest Service) परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत राज्यात ११ वा क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे त्यांची सहायक वनसंरक्षक (Assistant Conservator of Forest – ACF) म्हणून निवड झाली आहे.
मंगेश हे शिवपुरी गावचे रहिवासी असून त्यांचे वडील आत्माराम सुरुशे हे व्यवसायाने शेतकरी आहेत. अवघी दोन ते तीन एकर शेती आणि मर्यादित आर्थिक परिस्थिती असूनही आपल्या मुलांना शिकवून अधिकारी बनवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. या स्वप्नाला साकार करण्यासाठी मंगेश यांनी प्रचंड मेहनत व जिद्दीच्या जोरावर स्पर्धा परीक्षांच्या विश्वात पाऊल टाकले.
मंगेश यांचा यशापर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षमय व प्रेरणादायी आहे. सध्या ते सांगली येथे निरीक्षक विधिक मापन (Inspector of Legal Metrology) या पदावर कार्यरत आहेत. मात्र, वर्ग–१ अधिकारी होण्याची जिद्द त्यांच्या मनात कायम होती आणि अखेर त्यांनी ते ध्येय साध्य केले.
विशेष म्हणजे, MPSC वनसेवा परीक्षेतील हा मंगेश यांचा दुसरा प्रयत्न होता. आपल्या यशाबाबत बोलताना त्यांनी आईशी संबंधित एक भावनिक अनुभव सांगितला. “तू पोलिसाच्या वर्दीत माझ्या स्वप्नात आला होतास,” असे आईने सांगितलेले वाक्य त्यांनी मनाशी पक्के ठेवले आणि त्यातूनच अधिक प्रेरणा घेत त्यांनी अभ्यासात स्वतःला झोकून दिले.आज मंगेश सुरुशे यांचे हे यश शिवपुरीसह संपूर्ण मेहकर तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरत असून, त्यांच्या यशाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
