खडकपूर्णा प्रकल्पाचे सात गेट उघडले; ११ हजार ४७२ क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा; प्रकल्पाच्या पाणलाेट क्षेत्रात जाेरदार पाऊस..!
Sep 20, 2025, 20:10 IST
देऊळगाव मही (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात माेठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णाच्या पाणलाेट क्षेत्रात जाेरदार पाउस झाला आहे. त्यामुळे, प्रकल्पात पाण्याची आवक माेठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे, २० सप्टेंबर राेजी प्रकल्पाचे सात गेट उघडण्यात आले असून नदीपात्रात ११ हजार ४७२ क्युसेक पाणी साेडण्यात येत आहे. या सातपैकी तीन ५० सेमीने तर चार गेट ३० सेमीने उघडण्यात आले आहेत.
जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून जाेरदार पाउस हाेत आहे. शुक्रवारी रात्री व शनिवारी पहाटे खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या सिल्लोड, फुलंब्री, भोकरदन, हसनाबाद, जाफ्राबाद आणि बुलढाणा जिल्ह्यातील भागात दमदार पाउस झाला. त्यामुळे, प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाली. प्रकल्पाचा जलसाठा ९९.७ टक्यांवर पाेहचला आहे. प्रकल्पात पाण्याची आवक सुरूच असल्याने सात गेट उघडण्यात आले आहे. यापैकी तीन गेट ५० सेमीने तर चार गेट ३० सेमीने उघडण्यात आले आहे. तसेच नदीच्या पात्रात ११ हजार ४७२ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.तरी याबाबत संबधितानी नदीकाठच्या गावांना इशारा द्यावा.नदी पात्रात गुरे, लहान मुलं तसेच गावकऱ्यांनी नदी पात्र ओलांडू नये व कोणी मासेमारी तथा नदी पात्रातून वाहतूक करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.