खळबळजनक! रायपूरच्या मतदार यादीत 'अफगाणिस्तान', 'बिस्तर पर जाना', 'अंतरवासना'सह धक्कादायक नावे; चौकशीची मागणी! आ. श्वेता महाले पाटील आक्रमक...

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)::चिखली विधानसभा मतदारसंघातील रायपूर गावाच्या मतदार यादीत अत्यंत संशयास्पद आणि विचित्र स्वरूपाच्या नावांच्या नोंदी आढळल्याने  खळबळ उडाली आहे. मतदार यादीत "मोहम्मद अफगाणिस्तान", "बिस्तर पर जाना", "पुराना", "तेलगू विकास खिलाडी", "प्रोडक्ट का जाणकारी", "साकी" आणि "अंतरवासना" अशा नावांच्या नोंदी दिसून आल्या आहेत. या नावांच्या व्यक्ती गावात वास्तव्यात नाहीत .या संपूर्ण प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी चिखलीच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी केली आहे.

आ.श्वेता महाले पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मतदार यादी हा भारतीय लोकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील आधार आहे. त्यामुळे त्यामधील प्रत्येक नोंद अचूक, सत्य आणि पात्र भारतीय नागरिकाची असणे आवश्यक आहे. मतदार यादीत चुकीच्या, बनावट किंवा संशयास्पद नोंदी राहिल्यास लोकशाही प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्यामुळे अशा प्रत्येक प्रकरणाची निवडणूक आयोगाने निष्पक्ष आणि सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.

त्यांनी नागरिकांनाही आवाहन करताना सांगितले की, आपल्या गावातील मतदार यादी प्रत्येकाने स्वतः तपासावी. एखादी नोंद संशयास्पद वाटल्यास त्याबाबत आवश्यक पुराव्यांसह निवडणूक नोंदणी अधिकारी किंवा निवडणूक आयोगाकडे हरकत नोंदवावी. योग्य पडताळणीनंतरच अशा नोंदींबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो.
"भारतीय लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार हा केवळ पात्र भारतीय नागरिकांचाच आहे. त्यामुळे मतदार यादीतील प्रत्येक नावाची शहानिशा होणे आवश्यक असून, कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या किंवा बनावट नोंदींना स्थान राहता कामा नये. लोकशाही वाचविण्यासाठी नागरिकांनीही सजग राहून सक्रिय सहभाग घ्यावा," असे आवाहनही आ. महाले यांनी केले आहे.

रायपूर गावातील या कथित संशयास्पद नोंदींची संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी. चौकशीत कोणतीही अनियमितता किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही आ. श्वेता महाले पाटील यांनी केली आहे.