"मेरी पंचायत"वर लाखोंचा घोटाळा? गवंढाळा ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप; चौकशी न झाल्यास उपोषणाचा इशारा...

 
खामगाव (भागवत राऊत : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : खामगाव तालुक्यातील गवंढाळा ग्रामपंचायतीतील विकासकामे, साहित्य खरेदी आणि विविध योजनांवरील लाखो रुपयांच्या खर्चात मोठी अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. "मेरी पंचायत" अॅपवरील नोंदी आणि प्रत्यक्ष कामांमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा करत ग्रामस्थांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी पंचायत समिती प्रशासनाकडे केली आहे. चौकशी न झाल्यास लोकशाही मार्गाने उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे.

ग्रामस्थ गोपाल सतीश पांढरे, महेंद्र रमेश पाटील यांच्यासह अनेक गावकऱ्यांनी पंचायत समितीकडे लेखी निवेदन सादर करून ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार, "मेरी पंचायत" अॅपवर दाखविण्यात आलेल्या खर्चाची माहिती आणि प्रत्यक्षात झालेली कामे यामध्ये गंभीर विसंगती असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, एकाच प्रकारच्या कामांची वारंवार नोंद करून निधी खर्च दाखविण्यात आल्याचा संशय आहे. काही कामांच्या पेमेंट ऑर्डर, अपलोड केलेले छायाचित्रे आणि प्रत्यक्ष कामांची स्थिती यामध्येही मोठा फरक असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ग्रामस्थांनी ज्या खर्चावर आक्षेप घेतला आहे, त्यामध्ये टीसीएल पावडर खरेदीसाठी २९ हजार रुपये, दिवाबत्ती साहित्य खरेदीसाठी ६९ हजार ५०० रुपये, सार्वजनिक विहिरीत आडवे बोर करण्यासाठी एका दिवसात १ लाख ३८ हजार ७०० रुपये, फवारणीसाठी २९ हजार रुपये तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी २ लाख १ हजार ६७६ रुपयांच्या खर्चाचा समावेश आहे.याशिवाय सीएससी मशीन, दिव्यांग निधीतून करण्यात आलेली साहित्य खरेदी, स्मशानभूमीतील पाणीपुरवठा, पाण्याची टाकी, विहीर दुरुस्ती आदी कामांबाबतही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ग्रामस्थांनी संबंधित सर्व कामांचे आर्थिक व्यवहार, मोजमाप पुस्तिका, पेमेंट ऑर्डर, प्रत्यक्ष कामांची पाहणी आणि "मेरी पंचायत" अॅपवरील नोंदी यांची पडताळणी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी केली आहे. चौकशीत अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
दरम्यान, या आरोपांमुळे गवंढाळा ग्रामपंचायतीतील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पंचायत समिती प्रशासन या तक्रारीची कोणती भूमिका घेते आणि चौकशीचे आदेश देते का, याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. तसेच तक्रारीतील आरोप हे ग्रामस्थांनी केलेले असून, संबंधित ग्रामपंचायतीची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही.