इसरूळचे लोकाभिमुख सरपंच सतीश पाटील भुतेकर ‘राज्यस्तरीय ग्रामरत्न पुरस्कार’ने सन्मानित...!
Aug 1, 2025, 10:27 IST
इसरूळ (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :ग्रामविकासाच्या अनोख्या कल्पना प्रभावीपणे राबवत गावाचा सर्वांगीण विकास साधणारे लोकाभिमुख सरपंच सतीश पाटील भुतेकर यांना ‘राज्यस्तरीय ग्रामरत्न सरपंच पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. लोकसहभागातून गावाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या सरपंचांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. २९ व ३० जुलै २०२५ रोजी लोणावळा येथील सेरेनिटी रिसॉर्ट येथे अखिल भारतीय सरपंच परिषद व जयंत पाटील मित्र मंडळ, कुर्डू यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार वितरण सोहळा आयाेजित करण्यात आला हाेता. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सरपंचांचा गौरव करण्यात आला.
यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माजी आयुक्त चंद्रकांत दळवी, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, जलतज्ज्ञ अनिल पाटील व जल अभ्यासक सतीश खाडे यांचा समावेश होता. या सर्व मान्यवरांनी ग्रामविकासाच्या विविध संकल्पनांवर उपस्थितांना मार्गदर्शनही केले.चंद्रकांत दळवी यांनी त्यांच्या निढळ गावातील यशोगाथा सांगताना सलग ४२ वर्ष ग्रामस्थांच्या सहभागातून गावाचा कायापालट कसा केला, याचा सविस्तर आढावा दिला. कुराडबंदी, चराईबंदी, नशाबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे गावाचे दरडोई उत्पन्न दहापट वाढले आहे. निढळ गावातील शाळा व ग्रामपंचायत इमारत आज राज्यातील ‘रोड रोल मॉडेल’ ठरत आहेत. त्यांनी सरपंचांना निढळ गावास भेट देण्याचे आवाहन करत, ‘निढळ ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न’ हे पुस्तक वाचण्याचा सल्लाही दिला.
श्रीमंत कोकाटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची ग्रामनीती स्पष्ट करताना, त्याकाळात झालेली शेतकऱ्यांसाठीची पहिली कर्जमाफी आणि महाराजांनी शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला देखील हात लावू नये असा दिलेला आदेश यांचा उल्लेख केला.
सुरेश खाडे यांनी पाण्याचे प्रदूषण आणि नैसर्गिक उपाययोजना यावर सखोल मार्गदर्शन केले. तर अनिल पाटील यांनी ‘स्वच्छ जलसमृद्ध गाव’ हीच भावी ग्रामविकासाची दिशा असल्याचे सांगितले आणि राज्यातील सरपंचांनी याकडे गांभीर्याने पाहावे असे मत मांडले. त्यांनी सरपंचांच्या अभिनव कल्पनांवर आधारित ‘ग्रामविकासाच्या संकल्पना’ हे पुस्तक प्रसिद्ध करण्याची सूचना दिली. या भव्य सोहळ्यामुळे सरपंच सतीश पाटील भुतेकर यांचे कार्य राज्यपातळीवर पोहोचले असून, त्यांना मिळालेला ‘ग्रामरत्न सरपंच’ पुरस्कार ग्रामीण नेतृत्वासाठी प्रेरणादायी ठरत आहे.