चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे ठरले‘उत्कृष्ट तहसीलदार';प्रशासनात नवकल्पना, माहिती-तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे निवड!
Jul 31, 2025, 18:43 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : प्रशासनात नवकल्पना, माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि अतिक्रमण विराेधी कारवाईसह विविध उपक्रमांमुळे चिखलीचे तहसीलदार संतोष सुमन दामोदर काकडे यांना 'उत्कृष्ट तहसीलदार' म्हणून निवडून सन्मानित करण्यात आले आहे. १ ऑगस्ट राेजी महसूल दिनानिमित्त त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या वतीने महसूल दिन २०२५ निमित्ताने विविध संवर्गातील उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या निवडीसाठी प्रशासनाने निश्चित केलेल्या १३ गुणात्मक निकषांवर आधारित तपासणी करण्यात आली. सुनील काकडे यांनी विविध निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत एकूण ९० टक्के गुण मिळवले आहेत. जिवंत सातबारा आणि शेतरस्त्यांसाठी त्यांनी पुढाकार घेतला.
चिखली तालुक्यातील सर्व गावांचे ७/१२ उतारे संगणकीकरण व अद्ययावत करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. तालुक्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करताना अनेक नवकल्पना राबवल्या. गावोगावी व शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष दाखला शिबिरे राबवून नागरिकांना सोयीस्कर सेवा दिली. कामकाजात कायदेशीर प्रक्रिया व शासन निर्णयांची अचूक अंमलबजावणी केली. पाणीटंचाई व नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रसंगावधान राखून प्रभावी उपाययोजना केल्या. अतिक्रमणविरोधी मोहिमेत ठोस कारवाई करत उल्लेखनीय कामगिरी केली. दप्तर दिरंगाई टाळणे व ई-गव्हर्नन्सची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. न्यायालयीन व दंडाधिकारी कामकाज: सक्षम व कायदेशीर पद्धतीने हाताळले. सर्व शासकीय मोहिमांमध्ये समयसूचकता व गुणवत्ता राखली. या सर्व क्षेत्रातील दमदार कामगिरीसाठी त्यांची "उत्कृष्ट तहसीलदार" म्हणून निवड झाली आहे. महसूल विभागात कार्यरत इतर अधिकाऱ्यांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत.