संग्रामपूर! जिल्हा बँक निवडणुकीत तिसऱ्या निकालातही सहकारची बाजी!; श्रीकांत मारोडे ४ मतांनी विजयी, झाडोकारांचा स्वतंत्र लढा ठरला अपुरा

 
बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीत आता तिसरा निकालही हाती आला असून, संग्रामपूर मतदारसंघात सहकार पॅनलचे श्रीकांत मारोडे यांनी बाजी मारली आहे. मारोडे यांना १५ मते, तर त्यांचे प्रतिस्पर्धी विश्वनाथ झाडोकार यांना ११ मते मिळाली. त्यामुळे मारोडे यांनी ४ मतांनी विजय मिळवला.

विशेष म्हणजे विश्वनाथ झाडोकार यांनी ‘खटारा’ चिन्हावर स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. मात्र या स्वतंत्र लढतीनंतरही मतदारांनी श्रीकांत मारोडे यांच्या बाजूने कौल देत सहकार पॅनलला विजयी केले.

दरम्यान, आजच्या मतमोजणीतील सुरुवातीचे तीन निकाल पाहता ‘एक त्यांचा... एक यांचा... आता सहकारची बाजी!’ असे चित्र निर्माण झाले आहे. पहिल्या फेरीत बुलढाणा मतदारसंघातून सहकार पॅनलचे सुनील उदयकार विजयी, तर मलकापूर मतदारसंघातून स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनलचे शिवा तायडे विजयी झाले होते. त्यानंतर संग्रामपूरचा तिसरा निकाल सहकार पॅनलच्या पारड्यात गेला आहे.

बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालकपदांपैकी १२ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित ९ जागांसाठी २३ ऑगस्ट रोजी मतदान झाले. एकूण १,८५७ पात्र मतदारांपैकी १,७५१ मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी ९४.३ टक्के होती.

आता सुरुवातीच्या तीन निकालांनंतर उर्वरित मतदारसंघांतील निकालांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सहकार पॅनल आणि शेतकरी परिवर्तन पॅनलमध्ये अंतिम बाजी कोण मारणार? याचे चित्र पुढील निकालांनंतर अधिक स्पष्ट होणार आहे.