डोणगाव येथे अवैध रेती वाहतुकीसाठीच खुला केला समृद्धी महामार्ग? महसूल यंत्रणेच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह, रेती माफीयांनी तयार केला अनधिकृत रस्ता...
Dec 24, 2025, 10:57 IST
डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : डोणगाव परिसरात महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे अवैध रेती वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. रेती माफियांनी चक्क बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गालगत अनधिकृत रस्ता तयार करून रात्री-अपरात्री सर्रास रेती वाहतूक सुरू केली असून, डोणगाव व परिसरात सर्वत्र बांधकामासाठी रेतीचे ढिग दिसत आहेत. मात्र, डोणगाव परिसरात रेती माफियांवर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
डोणगाव येथून जाणारा बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जलद वाहतुकीसाठी ओळखला जातो. मात्र, आता याच महामार्गाचा वापर अवैध रेती वाहतुकीसाठी केला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. डोणगावजवळील गोहोगाव शिवारात बेलगावकडे जाणाऱ्या मार्गावर नदीलगत रेती माफियांनी समृद्धी महामार्गावरील लोखंडी रॉड काढून रेती वाहने उतरविण्यासाठी थेट अनधिकृत रस्ता तयार केला आहे.
या प्रकाराकडे ना समृद्धी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष आहे, ना महसूल विभागाने याची दखल घेतलेली दिसते. परिणामी, समृद्धी महामार्गावरून खुलेआम अवैध रेती वाहतूक सुरू आहे. या गंभीर प्रकाराकडे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
