दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीवबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये - पालकमंत्री मकरंद पाटील
Sep 16, 2026, 19:33 IST
बुलढाणा (जिमाका : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राज्यातील १८ दुष्काळसदृश जिल्ह्यांची यादी शासनाने जाहीर केली असून त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश नसल्याची बातमी काही वृत्तपत्रे व माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. मात्र, शासनाने अद्याप राज्यातील कोणताही जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केलेला नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्या वस्तुस्थितीला धरून नसून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसामध्ये पडलेले खंड, अनियमित पर्जन्यमान तसेच त्याचा पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम याबाबत प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिल्या आहेत. पावसामध्ये पडलेल्या खंडामुळे पिकांची वाढ खुंटणे, विविध रोगांचा प्रादुर्भाव होणे तसेच उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षत घेऊनच खरीप पिकांचे पंचनामे करण्यात येतील.
याबाबत एनडीआरएफच्या निकषानुसार मुख्यमंत्री लवकरच याबाबत शासनस्तरावरुन पिकांचे नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे करण्याच्या सूचना देतील. त्यामुळे सध्या दुष्काळग्रस्त किंवा दुष्काळसदृश जिल्ह्यांची अंतिम घोषणा झालेली नसताना याबाबत बातम्या अथवा अफवांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये.