खडकपूर्णा प्रकल्पाच्या निविदेत ६.८८ काेटींचा घाेटाळा उघड; मुंबईतील कंत्राटदारावर गुन्हा! बनावट अनुभवपत्रांद्वारे शासनाची केली फसवणुक : एसबीसीच्या चाैकशीत घाेटाळा आला समाेर.!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यातील सर्वात माेठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा उपसा सिंचन याेजना क्रमांक ३ मधील मातीकरणाच्या कामात सहा काेटी ८८ लाख रुपयांचा घाेटाळा झाल्याचे समाेर आले आहे. या कामासाठी मुंबईतील ठेकेदार सैय्यद खाजा माेहिद्दीन याने बनावट अनुभावाचे प्रमाणपत्र जाेडून शासनाची फसवणुक केल्याचे समाेर आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेच्या आदेशानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दाखल केलेल्या तक्रारीवरून मुंबईतील ठेकेदार सैयद खाजा मोहिद्दीन याच्याविरुद्ध २ ऑगस्ट राेजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
खडकपूर्णा उपसा सिंचन याेजना क्रमांक ३ मधील मातीकरणाच्या कामासाठी सन २००९-१० मध्ये निविदा प्रक्रीया राबवण्यात आली हाेती. या  निविदा प्रक्रियेसाठी सैयद खाजा मोहिद्दीन यांच्या एस.एफ. कन्स्ट्रक्शन कंपनीने बनावट अनुभवपत्रे सादर करून खोट्या तांत्रिक पात्रतेच्या आधारावर कंत्राट मिळविले. या अनुभवपत्रांमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कामांचे आकडे अतिशयोक्तीपूर्ण दाखविले गेले होते. प्रत्यक्षातील काम व अनुभवपत्रांतील माहिती यामध्ये मोठा फरक असल्याचे तपासांत स्पष्ट झाले. वानगीदाखल १९,८९० घनमीटर भराव दाखविले असताना प्रत्यक्षात 'शून्य' काम झाले होते.


या प्रकरणाचा प्रारंभिक तपास एसीबीचे पोलिस उपअधीक्षक आर. एन. मळघणे यांनी केला होता. त्यानंतर तपासाची सूत्रे पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी यांच्याकडे देण्यात आली. त्यांनीही सखोल चौकशी करून दस्तऐवजांची पडताळणी केली. दरम्यान, सध्याचे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट अनुभवपत्रांमुळे अपात्र ठेकेदाराला कंत्राट मिळाले आणि इतर पात्र ठेकेदारांना अपात्र ठरविण्यात आले असल्याचे एसीबीने केलेल्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यानुसार, बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात फसवणूक करून दुसऱ्याची मालमत्ता मिळवणे, खोटे दस्तऐवज बनवणे, अधिकृत दस्तऐवजांमध्ये खोटेपणा करणे, फसवणूक करण्याच्या उद्देशाने खोटे दस्तऐवज तयार करणे, खोटे दस्तऐवज खरे असल्याप्रमाणे वापरल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकपूर्णा प्रकल्पाच्या कामात गैरप्रकार झाल्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली हाेती. या याचिकेची नागपूर खंडपीठाने गंभीरतेने घेत १२ डिसेंबर २०१४ रोजी शासनाला सखोल चौकशीचे निर्देश दिले. त्यानुसार मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, मुंबई आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्राच्या यांच्या माध्यमातून खडकपूर्णा पाटबंधारे उपसा सिंचन योजना टप्पा ३ मधील मातीकरण व तत्सम कामाची उघड चौकशी सुरू करण्यात आली होती.त्यातूनच हा घाेटाळा समाेर आला आहे.