नांदुरा शहरात ४१ तलवारींसह १.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त; सन उत्सवाच्या काळात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई..!
Updated: Aug 21, 2025, 13:52 IST
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : नांदुरा शहरातील शाहीण कॉलनीत धारदार तलवारींची अवैध विक्री करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.त्याच्याकडून पोलिसांनी ४१ तलवारींसह १.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अपर पोलीस अधीक्षक (खामगाव) श्रेणिक लोढा (भा.पो.से.) यांना २० ऑगस्ट रोजी मिळालेल्या माहितीनुसार, नांदुरा शहरातील शेख वसीम शेख सलीम (वय ३३, रा. शाहीण कॉलनी, नांदुरा) हा आपल्या राहत्या घरातून तलवारी विक्रीसाठी निघाला असल्याचे समजले. त्यानुसार, अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करून आरोपीला रंगेहाथ पकडले.
कारवाईदरम्यान आरोपीकडून पांढऱ्या रंगाच्या गठ्ठ्यामध्ये एकूण ४१ तलवारी आढळल्या. प्रत्येक तलवार ‘सिरोही की सुप्रसिद्ध तलवार – १०० साल वॉरंटी’ अशा कोरीव लेखनासह असून, त्यांची लांबी अंदाजे ८२ सेंमी आहे. या तलवारींची एकूण किंमत ८२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय आरोपीकडून पल्सर मोटारसायकल (किंमत ८० हजार रुपये) आणि व्हिओ कंपनीचा मोबाईल (किंमत २० हजार रुपये) असा एकूण १ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या नेतृत्वात स.पो.नि. सचिन पाटील व खामगाव पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केली.