‘डम्पिंग हटाव, गाव बचाव’; पुन्हईतील प्रस्तावित कचरा डेपोला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; कचरा डेपो रद्द करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह  वृत्तसेवा) : मोताळा नगरपंचायतीतर्फे मोताळा तालुक्यातील पुन्हई येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या कचरा डेपोला ग्रामस्थांकडून तीव्र विरोध होत आहे. हा प्रस्तावित कचरा डेपो तात्काळ रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी गोपाल काटे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हई येथील शेकडो ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

यावेळी ग्रामस्थांनी डफडे वाजवत जोरदार घोषणाबाजी केली. ‘डम्पिंग हटाव, गाव बचाव’ अशा घोषणा देण्यात आल्या, प्रस्तावित कचरा डेपोमुळे गावाच्या पर्यावरणावर आणि ग्रामस्थांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. पर्यावरणाचा विचार न करता डंपिंग ग्राऊंड उभारण्याचा प्रयत्न केल्यास त्याविरोधात तीव्र कायदेशीर संघर्ष उभारला जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. ग्रामस्थांच्या हिताचा आणि पर्यावरणाचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हई येथील प्रस्तावित कचरा डेपोचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा अशी मागणी आंदोलनकर्त्या ग्रामस्थांनी केली आहे.