शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय : बुलढाणा जिल्ह्यातील ८९,६२९ शेतकऱ्यांच्या खात्यात १२७ कोटी ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई जमा होणार; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन २०२४-२५ खरीप हंगामासाठी एकूण १२७ कोटी ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील ८९,६२९ शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असून, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी चर्चा करून तसेच पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सातत्याने पाठपुरावा केला. त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळत असून, नुकसानभरपाईची रक्कम खात्यात जमा होऊ लागली आहे. जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून आतापर्यंत तब्बल ६२८ कोटी ८० लाखांहून अधिक नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. यापैकी ३३० कोटी ५४ लाख रुपये आधीच २,२८,६३६ शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले होते. त्यानंतर आता नव्याने मंजूर झालेली १२७ कोटी ५० लाख रुपयांची मदत मिळणार आहे.

तालुकानिहाय नुकसानभरपाई

चिखली : २५,११० शेतकऱ्यांना ३७.१७ कोटी

मेहकर : २०,५८१ शेतकऱ्यांना २५.८८ कोटी

सिंदखेड राजा : ९,५१० शेतकऱ्यांना १७.३४ कोटी

खामगाव : ३,९४२ शेतकऱ्यांना १०.२१ कोटी

नांदुरा : ९,७०८ शेतकऱ्यांना ८.७७ कोटी

लोणार : ९,४१८ शेतकऱ्यांना ७.२४ कोटी

बुलढाणा : ३,६६८ शेतकऱ्यांना ६.६५ कोटी

मोताळा : २,४९१ शेतकऱ्यांना ४.०० कोटी

देऊळगाव राजा : २,५२० शेतकऱ्यांना २.८५ कोटी

जळगाव जामोद : १,०८८ शेतकऱ्यांना २.५५ कोटी

शेगाव : ७५६ शेतकऱ्यांना २.२७ कोटी

संग्रामपूर : ६१२ शेतकऱ्यांना १.९२ कोटी

मलकापूर : २२५ शेतकऱ्यांना ५९.७१ लाख

पुढील पाठपुरावा सुरू...

  राज्यातील प्रलंबित पीक विमा दाव्यांबाबतही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी कृषी मंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे. ही प्रकरणे मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांना आणखी मदत मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी तालुकास्तरीय पीक विमा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जनसंपर्क कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.