बोराखेडीच्या वाहतूक अंमलदार व होमगार्डकडून वाहनचालकांकडून वसुली? नियमांचे उल्लंघन झाल्याचे कारण सांगून घेतात पैसे; शिवसेना जिल्हा प्रमुखांचे एसपींना निवेदन

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : नियमांचे उल्लंघन केल्याचा बनाव करून वाहनचालकांकडून अवैधरित्या पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप बोराखेडी पोलीस स्टेशनअंतर्गत कार्यरत ट्रॅफिक पोलिस दांडगे व त्यांच्या साथीदार असलेल्या होमगार्डांवर करण्यात आला आहे. उध्दव सेनेचे जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून हा मुद्दा उपस्थित केला आहे.
निवेदनात भोजने यांनी नमूद केले आहे की, दर सोमवारी सकाळी सुमारे ९ ते दुपारी १.३० या वेळेत तरवाडी गावाजवळ ट्रॅफिक पोलिस दांडगे व होमगार्ड ट्रिपल सीट मोटारसायकल, IND नंबर नसलेली वाहने, हेल्मेट नसलेले बाईकस्वार, तसेच लग्नाची वाहने यांना थांबवून रोख रक्कम घेऊन सोडत असल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळत आहे.

नियमभंगाचा आरोप स्वतःवरच?
विशेष म्हणजे, ट्रॅफिक पोलिस दांडगे यांच्या स्वतःच्या दुचाकी क्रमांक MH 21 BD 0514 वर इंड नंबर प्लेट नसल्याचे, ते हेल्मेट न वापरता वाहन चालवित असल्याचे, तसेच त्यांच्या दुचाकीचा विमा नसल्याची माहिती मिळत आहे. शिवाय हे वाहन त्यांच्या नावावर नसल्याचेही दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

सदर घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, संबंधित कर्मचारी वाहन तपासणीसाठी अधिकृतपणे नियुक्त आहेत का?, याची स्टेशन डायरीत नोंद आहे का?, याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भोजने यांनी केली आहे.