रखडलेल्या घरकुल अनुदानासाठी रायपूर येथील लाभार्थी आक्रमक; रास्ता रोको आंदोलनाने वेधले लक्ष; बुलढाणा, चिखली मार्गावर वाहतुक काही काळ ठप्प, लेखी आश्वासनाने आंदोलन घेतले मागे...
बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुले मंजूर झाली असली तरी बहुतांश लाभार्थ्यांना केवळ पहिलाच हप्ता मिळाला आहे. पुढील हप्ते न मिळाल्याने घरकुलांचे बांधकाम रखडले आहे. अनेकांनी नवीन घरासाठी जुनी घरे पाडल्याने त्यांना सध्या भाड्याच्या घरात राहावे लागत असून मोलमजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांवर आर्थिक ताण वाढला आहे.
घरकुलांचे काम तातडीने पूर्ण व्हावे व प्रलंबित हप्ते मिळावेत या मागणीसाठी ग्रामस्थांनी १३ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता बस थांब्यावर रास्ता रोको सुरू केला. ग्रामपंचायत सदस्य नीलेश राजपूत व शमीम सौदागर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाची माहिती मिळताच गट विकास अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले. त्यानुसार रायपूर येथे एकूण ६४७ घरकुले मंजूर असून ६३० लाभार्थ्यांना पहिला हप्ता, १४५ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता आणि ४० लाभार्थ्यांना तिसरा हप्ता देण्यात आला आहे. उर्वरित १७ लाभार्थ्यांचे हप्ते आधार-पीएफएमएस प्रलंबित असल्याने थांबले असून प्रक्रिया पूर्ण होताच तेही वितरित करण्यात येतील, असे नमूद करण्यात आले.
दरम्यान, नवीन सहायक लेखा अधीक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर १० फेब्रुवारीपासून हप्ते ऑनलाइन पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले असले तरी प्रलंबित हप्ते तातडीने मिळावेत, अशी मागणी कायम आहे.