खामगाव परिसरात महिनाभरापासून पावसाची दांडी; सोयाबीनचे पीक सुकले, शेतात शेळ्या चारण्याची वेळ..!

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : खामगाव परिसरात गेल्या महिनाभरापासून पावसाने दांडी मारल्याने सोयाबीन पिकावर मोठे संकट ओढवले आहे. पावसाअभावी सोयाबीनची पाने सुकून गळून पडत असून शेंगाही सुकून खाली पडू लागल्या आहेत. त्यामुळे उत्पादनाची आशा जवळपास मावळल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांवर आता सोयाबीनच्या शेतात शेळ्या चारण्याची वेळ आली आहे.

खामगाव तालुक्यातील घारोड परिसरातील अनेक शेतांमध्ये सोयाबीनचे पाने सुकून गळून पडली आहेत. शेंगा सुकून खाली पडत असल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पिकात शेळ्या चारण्याची वेळ आली आहे. शेख बशीर शेख अब्दुल रा.घारोड यांनी आपल्या शेतात शेळ्या सोडल्या आहेत. ते म्हणाले, "महिनाभरापासून पावसाचा खंड पडल्याने सोयाबीनचे पीक सुकून गेले आहे. अपेक्षित उत्पादन मिळणार नसल्याने नाईलाजाने जनावरांना चाऱ्यासाठी शेतात सोडले आहे. "पिकाची योग्य काळजी घेतली, मात्र पावसाअभावी सोयाबीन पूर्णपणे सुकून गेली. काढणी करण्याऐवजी जनावरे चारण्यासाठी शेतात सोडण्याशिवाय पर्याय उरला नाही. शेतकरी पिकाचे संगोपन मुलाप्रमाणे करतो. मशागत, खते, फवारणीवर मोठा खर्च केला होता. मात्र आता पीक हातातून गेल्याने केलेला खर्चही वाया जाण्याची वेळ आली आहे." खामगाव परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाने तात्काळ शेतात येऊन नुकसानीचे पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.