पावसाने दडी मारली, पिके करपली; शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर आक्रोश! जळगाव जामोदमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; नुकसानभरपाई, पीकविमा अन् जनावरांच्या चाऱ्यासाठीही शेतकरी आक्रमक...
युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले. पावसाअभावी निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, पीक विम्याची नुकसानभरपाई, कर्जाबाबत दिलासा तसेच जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली.
अतिवृष्टीचे घाव अजूनही भरले नाहीत!
दरम्यान, ३० आणि ३१ जुलै रोजी जळगाव जामोद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीनेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अनेक नद्या-नाल्यांना पूर आला, काही ठिकाणी नदीपात्रांनी प्रवाह बदलला, तर अनेक शेतकऱ्यांची जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली. शेतीपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, अद्यापही अनेक नुकसानग्रस्तांना भरपाई मिळालेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.आधी अतिवृष्टीचा तडाखा आणि आता पावसाची दडी—शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांची तातडीने भरपाई द्यावी, पुरात वाहून गेलेल्या जनावरांची आर्थिक नुकसानभरपाई करावी आणि भविष्यात पूरस्थिती टाळण्यासाठी नद्यांचे खोलीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अनिलसिंह राजपूत, शिवदास खिरोडकर, अजय गिरी, वैभव जाणे, आकाश आटोळे, भागवत वाघ, अजहर शेख, त्रिलोकसिंग राजपूत, राजेंद्र राखुंडे, अशोक राखुंडे, अमोल बहादरे, सदाशिव जाणे, सय्यद भाऊ, निलेश अवसार, सागर वाघ, सागर गवई, उल्हास झाटे, सचिन झाटे, ज्ञानेश्वर अंभोरे, नारायण खंडारे, गौतम तायडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.