बुलढाणा जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम; मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा इशारा...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचे सक्रिय वातावरण कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ४ ते ७ जुलै या कालावधीत जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, मध्यम ते मुसळधार पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ४ आणि ५ जुलै रोजी बुलढाणा जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत एक-दोन ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळू शकतात. विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी.

६ आणि ७ जुलै रोजी पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असली तरी जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील. या काळातही काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.

सततच्या पावसामुळे नदी-नाले, ओढे आणि सखल भागातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यकपणे पूरग्रस्त किंवा पाण्याखालील मार्गांचा वापर टाळावा. विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नये. शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनपूर्वक करावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही पुढील चार दिवस मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही अंदाज असल्याने संपूर्ण विभागात पावसाचे सक्रिय वातावरण कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.