चिखलीत अवकाळी पाऊस, ढगफुटी व हुमणी अळीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या! क्रांतीकारी व शेतकरी संघटना आक्रमक! शेतकरी नेते विनायक सरनाईक म्हणाले, शासनाचा संथ प्रतिसाद....

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील अनेक गावांमध्ये ९ ऑगस्ट रोजी झालेल्या अवकाळी मुसळधार पाऊस व काही भागातील ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय गेल्या पंधरवड्यात हुमणी अळीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांचे उत्पन्न धोक्यात आले आहे. तरीदेखील अनेक गावांमध्ये पंचनामे सुरू न झाल्याने शेतकरी संघटना संतप्त असून प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
पांढरदेव, करतवाडी, महिमळ, वरखेड, भोरसा, भोरसी, घानमोड, मानमोड, तेल्हारा, बोरगाव, अंबाशी, खैरव, आमखेड या शिवारासह तालुक्यातील अनेक भागांत पाऊस, घरांची पडझड, विहिरी खचणे, पिकांचे नुकसान व जमिनी खरडून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. महसूल मंत्री यांनी पंचनाम्यांचे आदेश दिले असतानाही अद्याप काही भागांत पाहणी न झाल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.

संघटनांनी मागणी केली आहे की हुमणी अळीग्रस्त शेतकऱ्यांचे उर्वरित पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव तातडीने शासनास पाठवावा. तसेच फेब्रुवारी ते मे २०२५ या काळात अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेले कांदा, मका, पंपई व फळभाजी पिकांचे नुकसान, ज्यासाठी शासनाने २२ जुलै रोजी मदत जाहीर केली होती, ती रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने त्वरित वितरित करावी.

क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, नितिन राजपूत, दासा पाटील, मुरलीधर येवले यांच्यासह शेतकऱ्यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागण्यांचा आग्रह धरला. वेळेत नुकसान भरपाई न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.

सरनाईक यांनी सांगितले की, "एप्रिल महिन्यातील गारपीट व पावसाच्या नुकसानीसाठी मंजूर रक्कम तातडीने खात्यात जमा केली पाहिजे. शेतकऱ्यांना सतत नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतोय, मात्र शासन प्रतिसाद देण्यात संथ आहे."
या आंदोलनावेळी नितिन राजपूत, देविदास कणखर, संतोष शेळके, मुरलीधर येवले, रवि टाले, औचितराव वाघमारे, राजेश कुटे, भुंजगराव कुटे, प्रकाश तायडे, राजेंद्र कुटे, अमोल वायाळ यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.