अभिमानास्पद! आज दिल्लीत घुमणार बुलढाण्याचा आवाज! अनिल म्हस्के पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत पत्रकारांचा महासंगम!
नवी दिल्ली येथील विश्व युवा केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात देशभरातील विविध राज्यांतील प्रदेशाध्यक्ष, पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार आणि माध्यम क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. पत्रकारांच्या हक्क, सुरक्षा, स्वातंत्र्य, डिजिटल माध्यमांचे वाढते महत्त्व, सामाजिक सुरक्षा योजना, पत्रकार कल्याण आणि माध्यमांची विश्वासार्हता अशा अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर या अधिवेशनात सखोल चर्चा होणार आहे. पत्रकारांच्या हितासाठी तब्बल ३० महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करून ते केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार आहेत.
अनिल म्हस्के यांची ही वाटचाल केवळ पदांची नाही, तर पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढणाऱ्या नेतृत्वाची कहाणी आहे. विदर्भ अध्यक्ष म्हणून संघटनात्मक कामाची सुरुवात करून त्यांनी आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर अडीच वर्षे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वगुणांची दखल घेत त्यांच्यावर थेट राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. आज देशभरातील पत्रकार संघटनांना एकत्र आणण्याचे आणि संघटनेचा विस्तार करण्याचे मोठे काम ते समर्थपणे करत आहेत.
व्हॉईस ऑफ मीडिया आणि व्हीओएम इंटरनॅशनल फोरमचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या खांद्याला खांदा लावून अनिल म्हस्के यांनी देशभर संघटन विस्ताराचे उल्लेखनीय कार्य उभे केले आहे. पत्रकारांच्या प्रश्नांना राष्ट्रीय स्तरावर आवाज मिळावा, त्यांच्या हक्कांसाठी प्रभावी लढा उभा राहावा आणि पत्रकारितेचे भविष्य अधिक सक्षम व्हावे, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे व्हॉईस ऑफ मीडिया ही संघटना आज देशभरात प्रभावीपणे विस्तारत असून पत्रकारांमध्ये विश्वासाचे व्यासपीठ म्हणून ओळख निर्माण करत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातून राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेले हे नेतृत्व आज दिल्लीत देशभरातील पत्रकारांना एकत्र आणत आहे. पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणारे, संघटन उभारणारे आणि राष्ट्रीय स्तरावर बुलढाण्याचे नाव अभिमानाने उंचावणारे अनिल म्हस्के यांचे हे यश संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आणि गौरवास्पद ठरत आहे. दिल्लीतील हे राष्ट्रीय अधिवेशन म्हणजे केवळ पत्रकारांचा मेळावा नसून, बुलढाण्याच्या नेतृत्वक्षमतेवर देशभरातील पत्रकारांनी उमटविलेली विश्वासाची ठाम मोहोर असल्याची भावना जिल्ह्यात व्यक्त होत आहे.