महिला बचत गट ठेव संचय संकल्पनेतून निर्मित ‘राजलक्ष्मी अर्बन’चे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन..!
प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की, “महाराष्ट्रात सहकाराची वाटचाल मोठ्या प्रमाणात झाली आहे. सहकाराच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली असून याच कारणास्तव केंद्र सरकारमध्ये नव्याने सहकार मंत्रालय सुरू करण्यात आले आहे. महिलांना स्वावलंबी बनवण्याचे कार्य राजलक्ष्मी अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रभावीपणे करेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पतसंस्थेच्या कोषाध्यक्ष मनीषा राऊत यांनी प्रास्ताविकातून पतसंस्थेचे उद्दिष्टे आणि ध्येयधोरणे याविषयी माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात आमदार संजय गायकवाड म्हणाले की, “आमच्या लाडक्या बहिणी घर सांभाळत बचत गटांच्या माध्यमातून कार्यरत आहेत. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील महिला बचत गट ठेव संचयाच्या माध्यमातून पतसंस्थेमध्ये परिवर्तित झाले, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.”
यावेळी बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी मार्गदर्शन करताना पतसंस्थेने घ्यावयाची काळजी व अंमलबजावणीविषयी सल्ला दिला. भाजप जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विजयराव शिंदे यांनी महिलांचे सामाजिक योगदान अधोरेखित केले. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करत राजलक्ष्मी अर्बन महिला पतसंस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर श्री. सौभागे यांनी राजलक्ष्मी अर्बन पतसंस्थेच्या संचालकांनी बचत गटाच्या माध्यमातून केलेल्या कामांची माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.