प्रतापगडाला हादरे पण बुलढाण्यात गायकवाडांनी "गड" जिंकला! जिल्हा शिवसेनेत आ. गायकवाडांची पॉवर वाढली..
Dec 22, 2025, 15:15 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्यातल्या ११ नगरपालिकांचा निकाल काल लागला. भाजप नंबर १, काँग्रेस दुसऱ्या स्थानी तर शिंदेंच्या शिवसेनेला जिल्ह्यात तिसरे स्थान मिळाले आहे. अर्थात भाजपच्या विजयात घाटाखालच्या नगरपालिकांचा जसा मोठा वाटा तसाच वाटा शिंदेंच्या शिवसेनेसाठी घाटावरच्या नगरपालिकांनी उचलला. एका नगराध्यक्ष पदासह ४६ नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले, त्यापैकी ४२ नगरसेवक हे घाटावरील आहेत. शिवसेनेच्या राजकारणापुरते बोलायचे झाल्यास हा निकाल प्रतापगडाला हादरे देणारा तर आ. गायकवाडांची जिल्ह्यात "पॉवर" वाढवणारा ठरला आहे.
ना.प्रतापराव जाधव बोले अन् दल हाले अशी जिल्हा शिवसेनेतील अलीकडच्या वर्षभराआधीपर्यंत स्थिती होती. मात्र आता संघटनेत खरेच तशी स्थिती आहे का? असा प्रश्न उपस्थित झाल्यास त्याचे उत्तर नकारार्थीच येईल. घाटाखालच्या तालुक्यात शिवसेनेची ताकद फारशी नाही, खा.जाधव प्रत्येक लोकसभेत मताधिक्य घेतात ते घाटाखालच्या भाजपच्या भरवशावर.. त्यामुळे शिवसेनेची खरी ताकद ही घाटावरच, काल लागलेल्या नगरपालिका निकालातही तेच दिसले.घाटावर निवडून आलेल्या ४२ नगरसेवकांपैकी २२ नगरसेवक एकट्या बुलढाण्यातून आहेत. उर्वरित २० नगरसेवक हे चिखली, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार, मेहकर मधून आहेत. एकीकडे बुलढाण्यात आ.गायकवाड यांच्या नेतृत्वात मिळालेला एकतर्फी विजय आणि दुसरीकडे ना.जाधव, माजी आ. रायमुलकरांच्या मेहकर, लोणार मध्ये शिवसेनेचा झालेला पराभव या दोन बाबी ठळकपणे जाणवणाऱ्या आहेत..यातून आ. गायकवाडांच्या नेतृत्वाला उभारी मिळेल असे स्पष्ट संकेत आहेत.
"सबकुछ ठीक नहीं"
मागील लोकसभा निवडणुकीपासूनच आ. गायकवाड आणि ना.जाधव यांच्यात "सबकुछ ठीक" नाही.वेळोवेळी तशा बाबी राजकीय विश्लेषकांच्या नजरेतून सुटलेल्या नाहीत. नगरपालिका निवडणुकांच्या आधी माहोल तयार करण्यासाठी आ.गायकवाड यांनी चिखलीत एन्ट्री केली होती, मेळावाही घेतला होता, ना.जाधव व त्यांच्या समर्थकांना आ. गायकवाडांची ही उठाठेव काही पटली नव्हती. चिखलीत तर शिवसैनिक "कन्फ्युजही" झाले होते की ऐकायचे कुणाचे? तर असो, आता निकाल लागलाय.. आ.गायकवाडांच्या अंगावर गुलाल आहे पण ना. जाधवांना पराभव सहन करावा लागतोय.. नगरपालिकांचा हा निकाल आ.गायकवाडांना ताकद देईल ?
