"शुभेच्छांचे सौदागर" प्रसाद कुलकर्णी यांची गजानन धांडे यांच्याघरी आपुलकीची भेट; साधला मनमोकळा संवाद..
Updated: Oct 16, 2025, 13:14 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शुभेच्छांचे सौदागर अशी ओळख असलेले मराठीतील सुप्रसिद्ध कवी प्रसाद कुलकर्णी सर यांनी आज, गुरुवारी सकाळी गजानन धांडे यांच्या "रत्नाई " निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. कुटुंबीयांच्या वतीने केलेल्या सहृदय सत्काराला पाहून कवी प्रसाद कुलकर्णी भारावून गेले.
मराठी कवितांच्या ब्रह्मांडात प्रसाद कुलकर्णी नावाचा तेजस्वी तारा गेली अनेक दशके चमकत आहे. बुलढाणेकरांची रसिकता आणि कुलकर्णी यांची ‘आनंद यात्रा’ हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळतेय. यानुसार, पुन्हा एकदा शहरात प्रसाद कुलकर्णी यांच्या आनंद यात्रेचा कार्यक्रम आज सायंकाळी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने ते बुलढाण्यात आले आहेत. सकाळी गजानन धांडे यांच्या ‘रत्नाई’ निवासस्थानी दिलेल्या भेटीत त्यांनी आपुलकीचा संवाद साधला. धांडे कुटुंबीयांनी कुलकर्णी यांचा काळजापासून सत्कार केला. यावेळी धांडे यांनी बुलढाण्याच्या साहित्य संस्कृतीची माहिती दिली. बुलढाण्याची सामाजिक वीण अधिकाधिक घट्ट असल्याचे गौरवोद्गार कवी प्रसाद कुलकर्णी यांनी काढले. विविधतेने नटलेल्या शहराला साहित्य आणि संस्कृतीची परंपरा लाभल्याचे ते म्हणाले. आईवरील कवितेने प्रभावित झालेले गजानन धांडे यांनी त्यांच्यासमोर त्यांची कविता सादर केली. या कवितेला स्वतः कविवर्य कुलकर्णी यांनी देखील साथ दिली.
"तू असताना हे घर म्हणजे घमघमणारी बाग, तू नसताना याच घराला रितेपणाचा शाप ... राहशील तू जिथे ती माझी रामेश्वर काशी अन् स्वर्गप्राप्तीचे सौख्य मिळे मझ तुझ्या पावलांपाशी... तू नसतीस तर आयुष्याला अर्थच असता काय ? जन्मोजन्मी तूच असावी प्रेमळ माझी माय...”
आपल्या कवितांवरचे हे प्रेम पाहून कवी प्रसाद कुलकर्णी सर भारावून गेले. गजानन धांडे यांच्या मातृभक्तीचेही त्यांनी कौतुक केले. जवळपास अर्धा तास झालेल्या संवादात सर्वांनीच एकमेकांना वाटला तो आनंदाचा ‘प्रसाद’!
याप्रसंगी, श्रीमती रत्नमाला धांडे, रविकिरण दादा टाकळकर, पत्रकार राम हिंगे, अभिषेक वरपे, स्वप्नील धांडे, सौ.पुजा स्वप्नील धांडे उपस्थित होते.