निवडणुका संपल्या तरी राजकारण थांबेना; मेहकर नगरपालिकेच्या सत्कार सोहळ्यावर काँग्रेस व शिंदेसेनेचा बहिष्कार; नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्यासह सहा नगरसेवकांचीच उपस्थिती; राजकीय संघर्ष तीव्र होणार...

 
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मेहकर नगरपालिकेतील नवनिर्वाचित २६ नगरसेवक व नगराध्यक्षांच्या सत्काराचा कार्यक्रम काल नगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमाला काँग्रेसचे ११ आणि शिवसेना (शिंदे गट) चे ९ नगरसेवक गैरहजर राहिल्याने नगरपालिकेतील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उघड झाला आहे. कार्यक्रमास केवळ उध्दव सेनेचे नगराध्यक्ष किशोर गारोळे व त्यांचे सहा नगरसेवक उपस्थित होते.
मेहकर नगरपालिकेच्या निवडणुकीत उध्दव सेनेचे किशोर गारोळे नगराध्यक्षपदी विजयी झाले असून उबाठाचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र नगरसेवकांचे संख्याबळ पाहता उबाठाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.नगराध्यक्षपद काँग्रेसकडे न गेल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आहे. काँग्रेसचे सर्वाधिक ११ नगरसेवक विजयी झाले, मात्र नगराध्यक्षपदाचे उमेदवार व माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी अल्पमतांनी पराभूत झाले.

 नगरसेवकांचे बहुमत उबाठाकडे नसल्याने आमदार सिद्धार्थ खरात यांनी नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्यासह कासमभाई गवळी यांची भेट घेतली होती. त्या भेटीत गवळी यांनी आमदारांचा सत्कार केला असला, तरी काँग्रेस उबाठाला नगरपालिकेत सहकार्य करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली होती. आजच्या सत्कार कार्यक्रमातील गैरहजेरीतून त्याचीच प्रचिती आली आहे.

अघोषित बहिष्कारातून राजकीय संदेश
मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी सर्व नगरसेवकांचा सत्कार आयोजित केला होता. या कार्यक्रमात उध्दव सेनेचे नगराध्यक्ष किशोर गारोळे व सहा नगरसेवकांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.मात्र काँग्रेस व शिवसेना (शिंदे गट) च्या नगरसेवकांनी अघोषित बहिष्कार टाकत उबाठाला ठोस राजकीय संदेश दिला, अशी चर्चा आहे. हा बहिष्कार आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासाठीही राजकीय धक्का मानला जात आहे.

२० विरुद्ध ६ चे राजकारण कायम?
दोन दिवसांपूर्वी काँग्रेस व शिवसेना (शिंदे गट) च्या नेते व नगरसेवकांची गुप्त बैठक पार पडल्याची माहिती आहे. त्यात नगरपालिकेत एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय झाल्याचे समजते. त्यामुळे नगरपालिकेत ६ विरुद्ध २० नगरसेवकांचे समीकरण कायम राहणार असल्याचे आजच्या घटनेतून स्पष्ट झाले आहे. 
स्वीकृत नगरसेवकांची निवड तसेच विषय समित्यांच्या सभापती निवडीतही काँग्रेस व शिंदेसेना एकत्र राहणार, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे नगराध्यक्षपद जिंकूनही उबाठाला नगरपालिकेत प्रभावीपणे काम करणे आव्हानात्मक ठरणार असल्याचे चित्र आहे.दरम्यान, आजच्या कार्यक्रमात मुख्याधिकारी रामराजे कापरे, अभियंता अजय मापारी व किशोर ढेपले यांनी उबाठाचे नगराध्यक्ष व त्यांच्या सहा नगरसेवकांचा सत्कार केला.