बुलढाण्यात पोलिस भरती सुरू; १६० जागांसाठी १४ हजार २५३ उमेदवारांचे अर्ज; उमेदवारांनी प्रलोभनांना बळी न पडण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे आवाहन

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्हा पोलीस दलातील रिक्त पदांसाठी ११ फेब्रुवारी पासून पोलीस कवायत मैदान येथे भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. शिपाई पदाच्या १४८ आणि चालक पदाच्या १४ जागांसाठी ही भरती होत असून, त्यानुसार जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेसाठी एकूण १४,२५३ उमेदवार उपस्थित राहणार असून, परजिल्ह्यातून येणाऱ्या उमेदवारांसाठी राहण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पुरुष उमेदवारांची व्यवस्था ग्रामीण पोलीस ठाण्याजवळील पोलीस दलाच्या इमारतीत, तर महिला उमेदवारांसाठी दीपक जोग पेट्रोलियमजवळील इमारतीत निवासाची सोय करण्यात आली आहे.

सकाळी ५ वाजल्यापासून उमेदवारांच्या मैदानी चाचण्यांना सुरुवात होणार आहे. पहिल्या दोन दिवसांत सुमारे ८०० उमेदवार, तर उर्वरित दिवसांत दररोज सुमारे १,४०० उमेदवार उपस्थित राहणार आहेत. भरती प्रक्रियेदरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून अधिकारी व कर्मचारी मिळून एकूण ५२० पोलीस कर्मचारी कर्तव्यावर तैनात राहतील.

उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडू नये तसेच भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पडणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी दिली.