बुलढाणा जिल्ह्यात रासायनिक गुलालाच्या उत्पादन, विक्री आणि वापरावर कायमस्वरूपी बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश!
दिनांक १४ सप्टेंबर २०२६ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत श्री गणेशोत्सव साजरा होत आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर रासायनिक गुलालाचा वापर केला जातो. पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांनी जिल्हा प्रशासनाकडे दिलेल्या विनंतीनुसार यावर निर्बंध घालणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
आरोग्यासाठी घातक रसायने रासायनिक गुलालामध्ये लेड ऑक्साईड, कॉपर सल्फेट, क्रोमीयम आयोडाईड आणि ॲल्युमिनीयम ब्रोमाईड यांसारख्या घातक रसायनांचा वापर केला जातो. यामुळे डोळ्यांची ॲलर्जी, अंधत्व, ब्रॉन्कीयल अस्थमा, स्किन ॲलर्जी आणि कर्करोगासारखे गंभीर आजार होण्याचा धोका असतो. तसेच हा गुलाल जलस्त्रोतांमध्ये मिसळल्यास मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण, माती व हवेचे प्रदूषण होते.
आदेश :
१. संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात रासायनिक गुलालाचे उत्पादन, विक्री, साठवणूक आणि वापरावर कायमस्वरूपी बंदी लागू करण्यात आली आहे.
२. जिल्ह्यातील सर्व घाऊक, किरकोळ व्यापारी व साठवणूकदारांना रासायनिक गुलालाची विक्री अथवा साठवणूक करण्यास पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आला आहे.
३. रासायनिक गुलालाऐवजी नैसर्गिक व जैविक घटकांपासून तयार करण्यात आलेल्या सुरक्षित 'हर्बल' गुलालाचा वापर करावा.
4. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संस्था, घटक किंवा व्यक्तींवर कारवाई करण्याचे अधिकार पोलीस प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. यासाठी स्वतंत्र पथके तयार करून आवश्यक ती कारवाई केली जाईल.
आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा आस्थापनेवर 'पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६' च्या कलम १५ अन्वये कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत आणि पर्यावरणपूरक वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.