"सरकारची मस्ती उतरवण्याची ताकद जनतेत; ..नाहीतर शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरणार!" — दिल्लीतील लाठीचार्जवरून रविकांत तुपकरांचा इशारा;

"उद्योगपतींसोबत डील करायला वेळ, विद्यार्थ्यांसाठी लाठी?" केंद्र सरकारवर घणाघात
 
बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): दिल्लीतील जंतर-मंतरवर NEET पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या; अन्यथा आम्हालाही शेतकऱ्यांना घेऊन विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरावे लागेल," असा थेट इशारा तुपकर यांनी दिला आहे. बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ .प्रवीण देवरे यांची भेट घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधाचे निवेदनही सादर केले.
गेल्या काही दिवसांपासून NEET पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचा आरोप करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. २० जुलै रोजी विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला अनेक विद्यार्थी अक्षरशः रक्तबंबाळ झाले.या घटनेनंतर  संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली असून, विविध संघटना विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निषेध नोंदवला. निवेदन दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली.
"दिल्लीच्या जंतर-मंतरवर घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. सरकारचे डोके ठिकाणावर आहेत की नाही? आंदोलन करणारे विद्यार्थी काय दुसऱ्या देशातील आहेत? ही आपल्या देशातील शेतकऱ्यांची लेकरं आहेत. NEET पेपरफुटीमुळे विद्यार्थी हताश झाले आहेत. त्यांच्या भविष्याशी सरकारने खेळ करू नये," असे तुपकर म्हणाले.
 "हे विद्यार्थी काही तुमची सत्ता मागत नाहीत. ते फक्त न्याय आणि शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत. इतके दिवस आंदोलन सुरू आहे, पण सरकारकडे विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी वेळ नाही. मात्र उद्योगपतींसोबत डील करायला सरकारला वेळ मिळतो. विद्यार्थ्यांशी संवाद साधायला सरकार का घाबरते?"असा सवाल रविकांत तुपकरांनी केला.

तुपकर यांनी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवरही तीव्र टीका करत, "देशातील युवा, विद्यार्थी आणि शेतकरी हे सरकारच्या धोरणांमुळे त्रस्त झाले आहेत. विद्यार्थ्यांनी ठरवलं तर सरकारची खुर्ची हलायला वेळ लागणार नाही. सरकारने सत्तेच्या मस्तीत राहू नये. ही मस्ती उतरवण्याची ताकद जनतेत आहे," असा इशाराही दिला. "सरकारने वेळेत विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा आम्हालाही शेतकऱ्यांना सोबत घेऊन विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरावे लागेल. विद्यार्थ्यांवर लाठी चालवणाऱ्या सरकारला जनता योग्य वेळी उत्तर देईल असेही रविकांत तुपकर म्हणाले.