पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे : विजयराज शिंदे; लाेणार येथे भाजपचा कार्यकर्ता संवाद मेळावा! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी फुंकले रणशिंग..!
Aug 4, 2025, 16:18 IST
लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीप्रमाणे भरघोस यश मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी काल ३ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केले. शहरातील बनमेरू कॉलेजच्या जुन्या इमारतीत पार पडलेल्या या मेळाव्याला माजी जिल्हाध्यक्ष गणेश मांटे, प्रकाश गवई, दत्ता पाटील, विजय पवार, चंद्रकांत बर्दे, संतोष काळे, चक्रधर लांडे यांच्यासह शहर व तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात शिंदे यांनी तडाखेबंद भाषण करत आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. त्यांच्या भाषणामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
शिंदे यांनी सांगितले की, ही केवळ बैठक नाही, तर पक्षाच्या नव्या वाटचालीची सुरुवात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने संघटनेच्या रचनेनुसार एकसंघ काम करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीवेळी विरोधकांनी "संविधान बदल" हा खोटा प्रचार करून मतदारांची दिशाभूल केली. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीची पिछेहाट झाली. मात्र विधानसभा निवडणुकीत "लाडकी बहिण योजना" आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजना यशस्वी ठरल्या. यामुळे राज्यात महायुतीला यश मिळाले, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी शिंदे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला आणि विरोधकांवर टीका करत म्हटले की, "विरोधक फक्त टीका करतात, पण आम्ही काम करून दाखवतो." मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांच्या बळावर पुढे जात असून, आगामी निवडणुकीत भाजपाची भूमिका निर्णायक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मेळाव्यात ग्रामीण व शहरी भागातील अनेक कार्यकर्त्यांनी विजयराज शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि नवसंजीवनी निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. शहराध्यक्ष, युवा आघाडी, महिला पदाधिकारी आणि जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यामुळे लोणारमधील भाजपा संघटना अधिक बळकट झाल्याचे दिसून आले.
लाेणार शहराध्यक्षपदी शुभम बनमेरू, तर तालुका कार्याध्यक्षपदी गजानन मापारी
मेळाव्यात शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने शुभम बनमेरू यांची शहराध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. गजानन मापारी यांची तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यामुळे तालुका स्तरावरही संघटनात्मक समन्वय साधल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.