जिल्ह्यातील ७ हजारांवर शेतकरी ‘किसान सन्मान’चा २० वा हप्त्यापासून मुकले; ई-केवायसी, आधार सीडिंग प्रलंबित असल्याने बसला फटका; इतर तांत्रिक चुकांमुळेही शेतकरी वंचित!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान याेजने अंतर्गत तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दाेन हजार रुपये देण्यात येतात. या याेजनेचा २० वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. मात्र, जिल्ह्यातील ७ हजार १९९ शेतकरी या हप्त्याला मुकले आहेत. ई केवायसी नसणे, आधार सिंडींग नसणे आणि इतर तांत्रिक कारणांचा  फटका शेतकऱ्यांना बसला  आहे. त्यामुळे,ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी राहीली असेल, आधार सिडींग बाकी असेल त्यांनी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनाेजकुमार ढगे यांनी केले आहे. 
किसान सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना २० वा आर्थिक हप्ता देण्यात आला आहे. मात्र, ७,१९९ शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ मिळालेला नाही. यामागील प्रमुख कारणे म्हणजे ई-केवायसी न होणे, आधार सीडिंग प्रलंबित असणे, बँक खात्यांमध्ये आधारकार्ड न जोडणे आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यास विलंब होत आहे.

जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण ७१ कोटींवर रक्कम जमा करण्यात आली आहे. ही मदत शेतकऱ्यांसाठी माेठा आधार ठरत आहे. ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या २० हप्त्यांमध्ये प्रत्येक शेतकरी लाभार्थ्याच्या खात्यात एकूण ४० हजार रुपये जमा झाले आहेत. या आर्थिक साहाय्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे.

अशी करा ई केवायसी 
तुमच्या खात्यात किसान सन्मान योजनेअंतर्गत पैसे आले नसतील, तर सर्वप्रथम ई-केवायसी, आधार सीडिंग व बँक खात्याशी आधारकार्ड जोडलेले आहे का, याची खात्री करा. या तांत्रिक अडचणींमुळे बक्षीस मिळण्यात विलंब होऊ शकतो. कृषी कार्यालयात संपर्क साधावा. ई-केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार केंद्र, तसेच बँकेत संपर्क करावा. आवश्यक कागदपत्रे, जसे आधारकार्ड आणि बँक खाते माहिती घेऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनाेजकुमार ढगे यांनी केले आहे.