‘लाडकी बहीण’ योजनेचा अनाथ, निराधार, बेघर बालकांना फटका; गेल्या आठ महिन्यांपासून अनाथ, निराधार, बेघर बालके लाभापासून वंचित...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राज्यात एकीकडे मुख्यमत्री लाडकी बहीण योजनेवर कोट्यावधी रुपये उडविले जात असताना दुसरीकडे जे गरजु आहेत अशा अनाथ, निराधार, बेघर बालकांना आठ महिन्यांपासून लाभच मिळाला नसल्याचे चित्र आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सहा हजार 56 पात्र बालकांना अनुदानाच्या लाभाची प्रतीक्षाच असल्याचे धक्कादायक चित्र आहे.  
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत शून्य ते १८ वर्षे वयोगटातील अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर तसेच एकल पालकांच्या मुलांना संगोपनासाठी प्रति महिना २,२५० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. बुलढाणा जिल्ह्यात या योजनेचे 6 हजार 54 लाभार्थी आहेत, तर राज्यातील लाभार्थ्यांची संख्या दीड लाखांपर्यंत असू शकते. मात्र, या सर्व बालकांना गेल्या आठ महिन्यांपासून एकाही महिन्याचे आर्थिक सहाय्य मिळालेले नाही, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

यामुळे विशेषतः एकल पालक व पालकविहीन बालकांच्या संगोपनामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असून संबंधित पालक व संरक्षकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पुनर्प्राप्तीसाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी व्यापक मागणी होत आहे.
दरमहिन्याला लाडकी बहीण योजनेसाठी विविध विभागाचा निधी वळती करण्यात येत आहे. त्याचा फटका समाज कल्याण विभागासह इतर विभागांच्या योजनांना बसत आहे. या योजनेचा फटका आता अनाथ, निराधार, बेघर बालकांनाही बसत असल्याचे चित्र आहे. 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत जिल्ह्रयात 6 हजार 54 पात्र बालके आहेत. या बालकांना शासनाकडून मान्यता मिळालेल्या 12 संस्थांच्या माध्यमातून लाभ देण्यात येतो. एकल पालक तथा निराधार बालकांच्या शिक्षणात खंड पडू नये,यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. 
अमोल डिघोळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,बुलढाणा