३ कोटी नव्हे, १० कोटींचा खर्च; तरी रायपूर तहानलेलेच! ग्रामपंचायतीसमोर महिलांचा ठाम इशारा; महाजल-जलजीवन योजनांची पोलखोल; पाच वर्षे नळ कोरडे, रायपूरकरांचा संताप टोकाला

 
रायपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : येथे कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चूनही भीषण पाणीटंचाई कायम असल्याने ग्रामस्थांचा संताप उफाळून आला आहे. गावात महाजल योजनेसाठी सुमारे ३ कोटी ८७ लाख रुपये, जलजीवन मिशनअंतर्गत ४ कोटी २५ लाख रुपये आणि ग्रामपंचायतीमार्फत जवळपास २ कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र इतक्या मोठ्या खर्चानंतरही मागील पाच वर्षांपासून गावात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची गंभीर तक्रार नागरिकांनी केली आहे.
अनेकदा दोन-दोन महिने नळाला पाणी येत नसल्याने महिलांसह सर्व ग्रामस्थांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पाण्यासाठी होणारी दररोजची धडपड असह्य झाल्याने गावातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकत्र येत प्रशासनाला थेट जाब विचारला. गटविकास अधिकारी व पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत आठवड्यात किमान एकदा तरी शुद्ध व सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी ठाम मागणी महिलांनी केली.
या वेळी मोहम्मद एजाज मोहम्मद मंजूर, राजू नेता, फयाज भाई, साबीर (उपसरपंच), अमोल पाटील, अविनाश सुरडकर, सागर इंगळे, संतोष सोनुने, काय्युम भाई, सलीम खान, नईम भाई, शेख अजहर, अफसर, मुकीम शाह यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, तातडीने ठोस उपाययोजना करून रायपूरचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.