केवायसी करूनही अनुदान नाही! लाडक्या बहिणींचा संताप उसळला; दोन दिवसांत दोन कार्यालयांवर धडक; सोमवारी महिला-बालविकास, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन
जिल्ह्यात सुमारे ६.५ लाख महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक त्रुटींमुळे जवळपास ३० हजार महिलांचा लाभ तात्पुरता थांबविण्यात आला आहे. ई-केवायसी अपूर्ण राहणे, चुकीचा पर्याय निवडला जाणे, माहितीअभावी झालेल्या नोंदींच्या चुका, आधार-बँक खात्यांची जुळवणी न होणे ही कारणे प्रशासनाने पुढे केली आहेत. या घोळामुळे जिल्ह्यातील सुमारे १० टक्के अर्ज नामंजूर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
“सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही पैसे खात्यात का जमा होत नाहीत?” असा थेट सवाल महिलांनी उपस्थित केला. सोमवारी महिला-बालविकास कार्यालयात प्रचंड गर्दी उसळली होती. लाभ बंद झाल्याच्या अफवेमुळे महिलांमध्ये प्रचंड संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, मंगळवारी खामगाव येथील संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले. तब्बल तासभर प्रशासनाला घेराव घालण्यात आल्याने यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. ओबीसी महासंघाचे नेते गणेश चौकशे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी निवेदन व तक्रार अर्ज सादर केले.
आंदोलनकर्त्यांनी यावेळी ई-केवायसी दुरुस्तीसाठी स्वतंत्र व अंतिम संधी द्यावी, लाभ बंद होणार नाही, याबाबत स्पष्ट व लेखी परिपत्रक काढावे, अर्जातील त्रुटी महिलांना सोप्या व समजण्याजोग्या भाषेत समजावून सांगाव्यात, महिलांना वारंवार कार्यालयांचे उंबरठे झिजवायला लावू नये आदी मागण्या केल्या. तसेच एका महिन्यात तांत्रिक अडचणी दूर न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका महिन्यात सर्व तांत्रिक त्रुटी दूर करून लाभ सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. मात्र अफवांमुळे निर्माण झालेली अस्वस्थता, रखडलेले अनुदान आणि वाढता जनक्षोभ पाहता शासनाने तातडीने ठोस, स्पष्ट आणि विश्वासार्ह निर्णय जाहीर करणे अत्यावश्यक बनले आहे.
