बातमी कौतुकाची..चंदनपुरच्या भूमिपुत्राचा राज्यात डंका! छत्रपती संभाजी नगरात मिळाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार!
सोमेश इंगळे म्हणतात, हा पुरस्कार समाजाला समर्पित....
Sep 8, 2025, 14:26 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : चंदनपूरचा भूमिपुत्र व समाजकार्याची ओळख असलेले सोमेश सोपानराव इंगळे यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.रविवारी (७ सप्टेंबर २०२५) छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम नागरी विकास सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने ऑडिटर सोसायटी, पाणी टाकी टॉवरजवळ, टी पॉईंट येथे संपन्न झाला.
सुप्रसिद्ध वकील आनंदसिंग बायस, संत मीराबाई सेवा समितीचे संस्थापक चैतन्य गिरी महाराज, जेजे प्लसचे संचालक डॉ. जीवन राजपूत, लोकमतचे संपादक खंडाळकर सर आदींच्या हस्ते इंगळे यांना प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना सोमेश इंगळे म्हणाले, “हा पुरस्कार माझ्या मित्रपरिवार, कुटुंब आणि सहकाऱ्यांना समर्पित आहे. कुठलाही लाभ-लोभ न ठेवता माझ्यासाठी काम करणाऱ्या सहकाऱ्यांचे हे ऋण शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. त्यांच्या आधाराशिवाय माझा प्रवास अपूर्ण राहिला असता. या घोडदौडीसाठी सतत प्रेरणा देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.”
शेतकरी कुटुंबातून आलेले सोमेश इंगळे हे एम.फार्म शिक्षण घेतलेले असून, विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते, समाजसेवक व युवा वक्ते म्हणून त्यांची ओळख आहे. रुग्णसेवा, विद्यार्थी प्रतिनिधित्व, तसेच बहुराष्ट्रीय कंपनीत जबाबदारीची पदे भूषवत त्यांनी समाजकार्यात सातत्य राखले आहे. त्यामुळे त्यांना हा सन्मान मिळाल्याबद्दल स्थानिक स्तरावर कौतुकाची लाट पसरली आहे.