नागपूर–पुणे वंदे भारत रेल्वेचा 10 ऑगस्टला शुभारंभ; शेगांवलाही मिळाला थांबा; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मानले रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांचे आभार..!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेस 10 ऑगस्ट पासून सुरू होणार असून संत नगरी शेगांव येथेही थांबा मिळाला आहे.शेगाव येथे थांबा मिळावा यासाठी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री आणि बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी पाठपुरावा केला होता. यासंदर्भातील परिपत्रक रेल्वे विभागाने 7ऑगस्ट रोजी जारी केले आहे.
नागपूर–पुणे वंदे भारत रेल्वेचा शुभारंभ 10 ऑगस्ट रोजी होणार असून, या रेल्वेमुळे नागपूर आणि पुणे येथून संत गजानन महाराजांच्या भक्तांना प्रवासासाठी अधिक सोयीची सुविधा मिळणार आहे. शेगांवला थांबा मिळवण्यासाठी प्रतापराव जाधव यांनी नुकतीच रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मागणी केली होती. त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला.

देशांतर्गत रेल्वेसेवेला गती देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत रेल्वे सेवा सुरू केली. वेगवान आणि आधुनिक सुविधांनी सज्ज असलेली, भारतीय तंत्रज्ञानातून विकसित झालेली ही रेल्वे प्रवाशांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. नागपूर–पुणे वंदे भारत मार्गावर सुरुवातीला अजनी, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर आणि दौंड अशा थांब्यांचा समावेश होता.

विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगांवला देशभरातून भाविक येतात. त्यामुळे वंदे भारत रेल्वेला शेगांव येथे थांबा देण्याची आवश्यकता प्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्र्यांना पटवून दिली. शेगांव संस्थानाचे महत्त्व आणि भाविकांची संख्या लक्षात घेऊन रेल्वे बोर्डाने 7 ऑगस्ट रोजी संचालक संजय निलम यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक काढले.

नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. नागपूरहून सकाळी 9.50 वाजता सुटणारी ही रेल्वे वर्धा, बडनेरा, अकोला मार्गे दुपारी सुमारे 1.20 वाजता शेगांवला पोहोचेल. परतीच्या प्रवासात पुण्यावरून दुपारी 2.45 वाजता सुटताना देखील ती शेगांवला थांबेल.

884 किमी अंतराचा हा प्रवास वंदे भारत अवघ्या 10 तासांत पूर्ण करेल. सकाळी 9.50 वाजता नागपूरहून सुटणारी ही गाडी त्याच दिवशी रात्री 9.50 वाजता पुण्यात पोहोचेल.