मुंबईच्या सराफ व्यापाऱ्याला समृद्धी महामार्गावर लूटले; पाच किलो सोने लंपास; टॅक्सीचालकाचा कटात सहभाग!

 
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुंबईच्या सराफ व्यापाऱ्याला समृद्धी महामार्गावर डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटल्याची धक्कादायक घटना काल (२२ ऑगस्ट) सायंकाळी उघडकीस आली आहे.विशेष म्हणजे टॅक्सी चालकही या दरोड्यात सहभागी असल्याचे समोर आले आहे.या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईतील शेषमलजी जैन हे सराफा व्यापारी खामगाव येथे व्यापाराच्या कामानिमित्त आले होते. काल सायंकाळी ते खामगावहून मुंबईकडे परत जात असताना मेहकर टोल नाक्यानंतर समृद्धी महामार्गावर ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वाहन चालकाने अचानक कार थांबवून "मला थोडं फ्रेश व्हायचं आहे" असं सांगत रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली. त्याच वेळी मागून आलेल्या एका चारचाकी वाहनातून उतरलेल्या चार दरोडेखोरांनी कारमध्ये बसलेल्या जैन यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यांनी कारमधील साडेचार ते पाच किलो सोने असलेली बॅग आणि रोकड घेऊन पसार झाले. धक्कादायक म्हणजे, जैन यांचा टॅक्सीचालकही या दरोडेखोरांच्या वाहनात बसून निघून गेला आहे.

घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी व्यापाऱ्याला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करून दरोडेखोरांचा शोध घेतला, मात्र ते पसार होण्यात यशस्वी झाले. दरम्यान, दरोडेखोरांची कार अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्याजवळ सोडून दिलेली आढळून आली आहे. पुढील तपास मेहकर पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शेषमलजी जैन हे मुंबईतील झवेरी बाजारातील ‘मंगळसूत्रम’ नावाच्या प्रतिष्ठानात कार्यरत असून, त्या प्रतिष्ठानचे मालक महेशभाई हे सुवर्ण आभूषण संघटनेचे अध्यक्ष आहेत. ऑर्डर घेण्यासाठी जैन हे विविध ठिकाणी प्रवास करत असतात. जिल्ह्यात आल्यानंतर त्यांनी मुंबईकडे जाण्यासाठी समृद्धी महामार्ग निवडला होता. याचाच फायदा घेत दरोडेखोरांनी हा डाव आखल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांच्या तपासानुसार, टॅक्सीचालकाने दरोडेखोरांशी संगनमत करून लूट केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.