मोताळा नगराध्यक्ष माधुरी देशमुख यांच्यासह इतरांना अटकपूर्व जामीन मंजूर; नगराध्यक्षांच्या जामीनासाठी ऍड शर्वरी सावजी - तुपकरांचा दमदार युक्तीवाद..!
Jul 28, 2025, 18:40 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :मोताळा येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी बनावट ठराव व बनावट ना हरकत प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मोताळा नगराध्यक्ष माधुरीताई देशमुख यांच्यासह इतर चौघाविरुद्ध बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आपल्याला अटक होऊ नये यासाठी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून माधुरी देशमुख यांनी ॲड. शर्वरी सावजी -तुपकर यांच्यामार्फत न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. ॲड. शर्वरी सावजी -तुपकर यांनी याप्रकरणी न्यायालयात केलेल्या प्रभावी युक्तिवादामुळे माधुरी देशमुख यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
मोताळा येथे सौर प्रकल्प उभारायच्या दृष्टीने पॉवर इंडिया व्हेंचर्स प्रा. लिमिटेड या कंपनीला नगर पंचायतीचा बनावट ठराव व मुख्याधिकारी गणेश पांडे यांची बनावट सही शिक्का असलेले ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप,व यामुळे नगरपंचायतीचा दहा लाखाहून अधिक विविध स्वरूपाचा कर बुडाला. बनावट कागदपत्रे तयार करण्यासह शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केल्याप्रकरणी मोताळा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा श्रीमती माधुरी पुरुषोत्तम देशमुख यांच्या सोबतच स्वीकृत नगर सेवक अमोल देशमुख, नगर पंचायतचे कर्मचारी सुनील मिरकुटे व कंपनीचे कर्मचारी महेश सहाणे , शांताराम लोखंडे यांचे विरुद्ध बोराखेडी पोलीस स्टेशन येथे भा दं वि चे कलम 420, 467, 468 34 अन्वये बोराखेडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू यांचे फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आलेला होता. बोराखेडी पोलिसांनी या सर्वांना अटक करण्याची तयारी चालवली होती. परंतु नगराध्यक्षा माधुरीताई देशमुख व इतर सर्व आरोपी गुन्हा दाखल झाल्या पासून भूमिगत होते. आपल्यावर झालेली ही कारवाई राजकारणातून आणि आकसापोटी झाल्यामुळे सर्वांनी मलकापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जमानत मिळणे करीता धाव घेतली होती. दरम्यान या प्रकरणी 28 जुलै रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. बी. जाधव यांच्यासमोर सुनावणी झाली. माधुरी देशमुख यांचेसाठी ऍड शर्वरी सावजी- तुपकर यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करून बनावट ना हरकत प्रमाणपत्राशी माधुरीताई देशमुख यांचा काही संबंध नसून राजकीय वैमनस्यातून त्यांना ह्यात गोवण्यात आले आहे ह्याकडे मा. न्यायालयाचे लक्ष वेधले अनेक प्रभावी मुद्दे मांडून ताकदीने बाजू मांडली, तो युक्तीवाद ग्राह्य धरत मा. न्यायालयाने नगराध्यक्षा माधुरी देशमुख यांना सशर्त अटकपूर्व जमानत मंजुर केली आहे. तसेच या प्रकरणातील इतर आरोपी असलेले स्वीकृत नगर सेवक अमोल देशमुख, नगर पंचायत मोताळाचे कर्मचारी सुनील मिरकुटे व कंपनीचे कर्मचारी महेश सहाणे , शांताराम लोखंडे यांचेसाठी वेगवेगळ्या वकिलांनी काम पाहिले. याही आरोपिंना न्यायालयाने सशर्त अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे.