शेतकऱ्यांना ध्यानात घ्या! नाहीतर प्रॉब्लेम होईल! २० मे पर्यंत फार्मर आयडी नोंदणी करा; कृषी योजनांसाठी आता अनिवार्य...
Apr 29, 2026, 19:34 IST
बुलढाणा(जिमाका/बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राज्यात कृषी क्षेत्राच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत आता कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी 20 मे 2026 पूर्वी फार्मर आयडी तयार करून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
दि. 14 नोव्हेंबर 2024 पासून ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून, दि. 15 एप्रिल 2025 पासून फार्मर आयडी सक्तीचा करण्यात आला आहे. राज्यात एकूण 1.71 कोटी खातेदारांपैकी 1.32 कोटी शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी पूर्ण केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
शेतकरी आपल्या नजिकच्या सेवा सुविधा केंद्रावर जाऊन किंवा ॲग्रीस्टॅक पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने सहज नोंदणी करू शकतात. भविष्यात कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच बियाणे, खते, औषधे यांसारख्या कृषी निविष्ठा मिळवण्यासाठी फार्मर आयडी अत्यावश्यक ठरणार आहे.
नोंदणी प्रक्रियेत अडचण आल्यास संबंधित विभागीय हेल्पडेस्कशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. अमरावती विभागासाठी अजितकुमार गेजगे (9657109809), पुणे विभागासाठी संगीता ननावरे (7588509492), कोकण विभागासाठी सोनाली वाडेकर (9404953518), छत्रपती संभाजीनगर विभागासाठी शीतल कौदरे (9172319637), नागपूर विभागासाठी अजितकुमार गेजगे (9657109809) आणि नाशिक विभागासाठी सोनाली वाडेकर (9404953518) यांच्याशी संपर्क साधावा, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.