भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदेंकडून भेटीगाठी वाढल्या! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी, गिरीश महाजन यांच्या घेतल्याभेटी! विधान परिषदेवर संधी मिळणार?

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभेच्या सदस्यांकडून निवडून देण्यात येणाऱ्या विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होत आहे. सध्याची संख्याबळ पाहता भाजपच्या वाट्याला ५ जागा आरामात जातील..दरम्यान या ५ पैकी किमान २ जागांवर विदर्भातील सदस्यांना संधी दिल्या जाऊ शकते, अशात  भाजपचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांना संधी मिळू शकते.तशी चाचपणी देखील पक्षश्रेष्ठींकडून सुरू आहे.
 गेल्या दोन दिवसात जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्याकडून भेटी गाठींचे सत्र वाढले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीसाठी शिंदे यांनी नागपूर गाठले. त्याआधी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचीही शिंदे यांनी जामनेर मध्ये भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेचा नेमका तपशील समोर आलेला नसला तरी विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानेच चर्चा झाल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. भाजपच्या संघटनरचनेत घाटावरच्या बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या ४ पैकी केवळ एकाच मतदार संघात भाजपचा आमदार आहे. बुलडाणा, मेहकर, सिंदखेडराजा या मतदार संघात भाजपला आतापर्यंत फारसे यश कधी मिळाले नव्हते..त्यामुळे संघटनेला ताकद देण्यासाठी विजयराज शिंदे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. २०२४ च्या  लोकसभा निवडणुकीचा चेहरा म्हणून भाजपकडून शिंदेंना पुढे करण्यात आले होते, त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता..मात्र युती झाल्याने पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार त्यांनी माघार घेतली होती. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत देखील पक्षाच्या सूचनेवरून त्यांना माघार घ्यावी लागली होती. आता दोन वेळेस चुकलेली संधी भरून निघते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.