वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसवणे अनिवार्य; अन्यथा होणार दंडात्मक कारवाई; HSRP बसून घेण्याचे आवाहन...
HSRP ही विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये असलेली क्रमांक प्लेट असून त्यामध्ये क्रोमियम आधारित होलोग्राम, लेझर कोड आणि कायमस्वरूपी लॉकिंग व्यवस्था असते. त्यामुळे वाहनांची ओळख पटविणे सुलभ होते तसेच चोरी, बनावट क्रमांक प्लेटचा वापर आणि अन्य गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
वाहनधारकांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर नियुक्त केंद्रावर वेळापत्रकानुसार HSRP बसवून घेता येणार आहे. वाहनांच्या प्रकारानुसार शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, निर्धारित मुदतीनंतर HSRP नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येऊ शकते. त्यामुळे सर्व दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहनधारकांनी विलंब न करता HSRP बसवून घ्यावी. वाहनधारकांनी अधिकृत केंद्रांची माहिती आणि नोंदणी प्रक्रियेविषयी तपशील संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून घ्यावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.