विवाहित महिलेशी लग्न लावून केली धाडच्या युवकाची फसवणूक ; चौघांना अटक, दोन फरार!

 
धाड (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आधीच विवाहित असलेल्या महिलेसोबत लग्न लावून २८ वर्षीय युवकाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी  पीडित युवकाच्या तक्रारीवरून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चार जणांना अटक केली, तर दोन आरोपी फरार आहेत.
पीडित युवक वैभव विठ्ठल माळोदे (वय २८) रा.धाड.याने दिलेल्या तक्रारीनुसार, काही व्यक्तींनी त्याला लग्नासाठी मुलगी असल्याचे सांगून पैसे व दागिने उकळले आणि नंतर कोमल दिलीप पाटील (रा. इंदिरानगर, शेगाव) या विवाहित महिलेशी त्याचे लग्न लावले. तपासात हे प्रकरण संगठित फसवणूक रॅकेट असल्याचे समोर आले असून, आरोपींनी बनावट कागदपत्रांचा वापर करून लग्न लावल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी कोमल पाटील, योगेश माधव थोरात, प्रतिभा ऊर्फ हिरा गांगुर्डे (रा. पेंढुर्ली, ता. सिन्नर, जि. नाशिक) आणि साक्षी गणेश कालाप या चौघांना अटक केली आहे.

फरार आरोपींचा शोध सुरू

या प्रकरणात नितीन भरत जमधाडे (रा. नाशिक) आणि अक्षय देवराज गजभरे (रा. पुसद, जि. यवतमाळ) हे दोघे फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता ८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. लग्नाच्या माध्यमातून तरुणांची फसवणूक करणारी टोळी राज्यात सक्रिय असल्याचे पोलिस तपासातून पुढे येत असून, या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार आशिष चेचरे, पीएसआय परमेश्वर केंद्रे आणि त्यांच्या पथकाकडून केला जात आहे.