जिल्ह्यात लम्पीचा पुन्हा शिरकाव; मलकापूरात एका बैलाचा मृत्यू! एका गायीवर उपचार सुरू; पशुसंवर्धन विभाग सतर्क !

 
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अनेक गुरांचे प्राण घेणाऱ्या लम्पी  आजाराचा जिल्हा पुन्हा शिरकाव झाला असून मलकापूर  शहरातील सालीपुरा प्रभागात एक बैल दगावला असून एका गायीवर उपचार सुरू आहेत. पशुसंवर्धन विभाग ॲक्शन मोडवर असून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. ३० जून रोजी सालीपुरा भागातील दोन जनावरांमध्ये लम्पी त्वचारोगाची लक्षणे आढळून आली. त्यापैकी एका बैलाचा मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्या गायीवर उपचार सुरू आहेत.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत तपासणी केली आणि रोग नियंत्रणाचे उपाय सुरू केले. मागील वर्षी तालुक्यात लम्पीचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे ६५० हून अधिक जनावरांना लसीकरण करण्यात आले होते. लसीकरणामुळे बहुतांश जनावरे सुरक्षित राहिली असून यंदाही तातडीने लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला जात आहे. पशुपालकांनी जनावरांमध्ये वरील लक्षणे दिसल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रात संपर्क साधावा. रोग पसरू नये, यासाठी लसीकरणासोबतच जनावरांचे योग्य विलगीकरण व स्वच्छता राखणेही अत्यावश्यक आहे. पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
ही लक्षणे दिसताच उपचार करा 

डोळे व नाकातून पाणी येणे, लसिका ग्रंथींची सूज, दूध उत्पादनात घट, चारा खाणे व पाणी पिण्याची इच्छा कमी होणे, तोंड, नाक व डोळ्यांभोवती व्रण निर्माण होणे, पायावर सूज येऊन लंगडणे अशी लक्षणे आढळताच तातडीने उपचार करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.