"निष्ठावंतांनो चिंता करू नका... येणारा काळ उद्धव ठाकरे साहेबांचाच!"; बुलढाण्यात शिवसेनेचा शक्तिप्रदर्शन मेळावा! जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवतांचा भाजपवर घणाघाती हल्लाबोल..!

राममंदिरातील चोरीच्या पापाची परतफेड भाजपला करावीच लागेल : जयश्रीताई शेळके; गजानन धांडे म्हणाले,विद्यार्थ्यांच्या लढ्याने सरकार झुकले! उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान, ५ हजार विद्यार्थ्यांना खाऊवाटप, वृक्षारोपणासह विविध सामाजिक उपक्रम
 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवत शिवसेनेने एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केले. रक्तदान शिबिर, पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना खाऊवाटप, रुग्णांना फळवाटप, मूकबधिर विद्यालय व सेवा संकल्प येथे गरजूंना मिष्ठान्न भोजन, वृक्षारोपण, शेतकऱ्यांना मोफत वृक्षवाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि जगदंबा देवीच्या मंदिरात महाआरती अशा उपक्रमांमधून उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी झालेल्या मेळाव्यात जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत आणि राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवत आगामी काळ उद्धव ठाकरे आणि निष्ठावंत शिवसैनिकांचाच असे ठामपणे सांगितले.

 

"नीट पेपरफुटी प्रकरणात न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्लीत मोदी सरकारने निर्दयी लाठीमार केला. मात्र त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी सर्वप्रथम खंबीरपणे उभे राहणारे नेते म्हणजे उद्धव ठाकरे. जवळपास महिनाभर चाललेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले. देशात नव्या बदलाची चाहूल लागली आहे. रात्र झाली की दिवस उगवतोच. कुणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही. त्यामुळे निष्ठावंतांनी चिंता करण्याचे कारण नाही; येणारा काळ हा उद्धव ठाकरे साहेबांचा आणि निष्ठावंत शिवसैनिकांचाच राहणार आहे," असे प्रतिपादन जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले.

उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी बुलढाण्याचे ग्रामदैवत असलेल्या जगदंबा देवीच्या मंदिरात पातळ अर्पण करून महाआरती करण्यात आली. त्याआधी २४ जुलै रोजी शेतकऱ्यांना मोफत वृक्षवाटप व ग्रामीण भागात वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा परिषद शाळांमधील पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. २६ जुलै रोजी सामान्य रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप, मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन, त्यानंतर गर्दे वाचनालयाच्या सभागृहात भव्य रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडला.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.

मेळाव्यात बोलताना जालिंदर बुधवत म्हणाले, "शिवसेनेमुळे सामान्य कार्यकर्त्यांना सत्ता आणि पदे मिळाली. उद्धव ठाकरे हे राजकारणातील सरळ, प्रामाणिक आणि संवेदनशील नेतृत्व आहे. शिवसेना ही सत्तेसाठी नव्हे तर अन्यायाविरोधात लढण्यासाठी जन्माला आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बूथ आणि प्रत्येक गाव मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे. सुरू असलेल्या मतदार नोंदणी प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचा अर्ज काळजीपूर्वक भरून घेऊन संघटना अधिक बळकट करण्यासाठी जोमाने कामाला लागा," असे आवाहनही त्यांनी केले.

राम मंदिरातील चोरीच्या पापाची परतफेड भाजपला करावीच लागेल : जयश्रीताई शेळके

राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी आपल्या भाषणात सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला. "प्रभू श्रीरामांच्या नावावर राजकारण करून सत्तेत आलेल्या भाजप सरकारला अयोध्येतील राममंदिरातील चोरीच्या पापाची परतफेड करावीच लागेल. उद्धव ठाकरे यांनी कोरोनासारख्या भीषण संकटात कुटुंबप्रमुखाप्रमाणे महाराष्ट्र सांभाळला. गद्दारी करणारे खासदार आज जनतेच्या न्यायालयात उघडे पडत आहेत. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढत असून सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनाही धमकावले जात आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात तरुणांचे रक्त रस्त्यावर सांडले, पण त्या लढ्याला सर्वप्रथम पाठिंबा देणारे उद्धव ठाकरेच होते. तरुणाईच्या आंदोलनापुढे केंद्र सरकार झुकले असून आता त्यांच्या सत्तेची उलटी गिनती सुरू झाली आहे," असा घणाघाती हल्ला त्यांनी चढवला.

शिवसेना संघर्षातून उभी राहिली : डी. एस. लहाने

सहसंपर्कप्रमुख डी. एस. लहाने यांनी सांगितले की, "शिवसेना ही संघर्षातून उभी राहिलेली संघटना आहे. शेतकरी, बेरोजगार, उद्योग आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी शिवसेना कायम लढत आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा समाजहिताचा विचार उद्धव ठाकरे पुढे नेत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देत दिलेला शब्द पाळला."

विद्यार्थ्यांच्या लढ्याने सरकार झुकले : गजानन धांडे

जिल्हा समन्वयक गजानन धांडे म्हणाले, "दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनामुळे 'हिम्मत हारू नका, कुणीही अजेय नाही' हा संदेश देशभर पोहोचला. विद्यार्थ्यांच्या या लढ्याला मातोश्रीच्या आदेशावरून सर्वप्रथम शिवसेनेने साथ दिली. अन्यायाविरोधातील प्रत्येक लढाईत शिवसेना अग्रभागी राहिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या रूपाने संयमी आणि परिपक्व नेतृत्व पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसावे यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागले पाहिजे."

किसान सेनेचे उपजिल्हाप्रमुख गजानन उबरहंडे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील शेतकरी कर्जमाफीची आठवण करून दिली. कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. प्रस्ताविक लखन गाडेकर यांनी केले. बाहेर मुसळधार पाऊस सुरू असतानाही गर्दे सभागृह निष्ठावंत शिवसैनिकांनी खचाखच भरून गेले होते.यावेळी राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, सहसंपर्कप्रमुख डी. एस. लहाने, जिल्हा समन्वयक गजानन धांडे, उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, विधानसभा संघटक सुनील घाटे, बुलढाणा तालुकाप्रमुख विजय इतवारे, मोताळा तालुकाप्रमुख विजय इंगळे, गजानन उबरहंडे, महिला आघाडीच्या प्रतीक्षा पिंपळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.