जिल्ह्यातील 93 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित, 72 रद्द; नियमभंगामुळे कारवाई! पराग शेतकरी कृषी केंद्र, धाडसह अनेक केंद्रांवर गाजली कारवाई; बोगस बी-बियाणे, जादा दराने खत विक्री ठरली महागात!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. नियम धाब्यावर बसवणाऱ्या व शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी केंद्रांवर कारवाई करत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांच्या निर्देशानुसार एकूण ९३ परवाने निलंबित करण्यात आले असून, यापैकी ७२ परवाने रद्द करण्यात आले आहेत. या कारवाईत मुदतबाह्य कीटकनाशके, बी-बियाणे विक्री, तसेच जादा दराने खत विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा समावेश आहे. 
पराग शेतकरी कृषी सेवा केंद्र, धाड या केंद्राने शेतकऱ्यांना मुदतबाह्य उत्पादने विकल्याचे दोष आढळून आले. यावर गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक  गणेश सावंत यांच्या तपासणीनुसार संबंधित केंद्राचे बी-बियाणे, खते व कीटकनाशके परवाने निलंबित करण्यात आले आहेत.त्याचप्रमाणे, वैभव कृषी सेवा केंद्र, रायपूर व साई कृषी सेवा केंद्र, पांगरी (ता. बुलडाणा) यांचेही खत विक्री दरम्यान अनियमितता आढळून आल्यामुळे त्यांच्या खत परवाने निलंबित करण्यात आले आहेत.कृषी विभागाच्या पथकांकडून खरीप हंगामात कृत्रिम टंचाई टाळण्यासाठी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची नियमित तपासणी सुरू आहे. यामध्ये जिथे बोगस किंवा जादा दराने निविष्ठांची विक्री आढळते, अशा केंद्रांवर तातडीने कडक कारवाई केली जात आहे. "खते, बियाणे आणि कीटकनाशकांची गैरसोय होऊ नये यासाठी कृषी विभाग सज्ज आहे. परवान्याविना किंवा नियमभंग करून काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल," असे परवाना अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी स्पष्ट केले आहे.