समृद्धी महामार्गलगत कृषी समृद्धी केंद्रांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; आमदार मनोज कायंदे यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव; शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीच्या बैठकीची मागणी...

 
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गलगत प्रस्तावित कृषी समृद्धी केंद्रांच्या मुद्द्यावर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शेतकऱ्यांच्या तीन प्रमुख मागण्यांवर शासनस्तरावर तातडीने निर्णय व्हावा, यासाठी आमदार मनोज कायंदे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत तातडीच्या बैठकीची मागणी केली आहे.

पत्रात नमूद करण्यात आले आहे की, समृद्धी महामार्ग परिसरात उभ्या राहणाऱ्या नव्या बाजारपेठांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. मात्र, निर्णयप्रक्रिया लांबल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत असून मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची तातडीची बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत, अशी ठाम भूमिका आमदारांनी मांडली आहे.
नवनगर अंतर्गत तीन कृषी समृद्धी केंद्रांचे प्रशासकीय काम पूर्ण झाले असून संबंधित अहवाल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर करण्यात आला आहे. धोते, लखागंगा, बाबतरा, पुरणगाव, धायगाव, जांबरगाव, सावरगाव माठ, निमखेड, गोगाव आणि नरीराबाद या भागांचा या केंद्रांमध्ये समावेश होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्यास संपादन प्रक्रिया वेगाने सुरू होऊन कृषी समृद्धी केंद्रांची उभारणी झपाट्याने पूर्ण होईल, असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला. त्यामुळे उर्वरित केंद्रांच्या विकासालाही चालना मिळून महामार्गालगतची कृषी अर्थव्यवस्था नव्या उंचीवर जाईल, असा दावा करण्यात येत आहे.आता मुख्यमंत्री स्तरावरील बैठक कधी होते आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षांना न्याय मिळतो का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.